राजकीय नेत्यांच्या आवाहनामुळे सुरू करण्यात आलेले म्हैसाळ योजनेचे पाणी शेतक-यांच्या मागणीअभावी २३ जानेवारीपासून बंद करण्यात येत आहे. लाभक्षेत्रातील २५ हजार हेक्टरची मागणी अपेक्षित धरून २ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले पाणी अवघ्या ३०० हेक्टर क्षेत्राची मागणी झाल्याने बंद करण्यात येत आहे.  
या संदर्भात कार्यकारी अभियंता म.श.धुळे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून वीजबिलाची तजबीज होत नसल्याने या योजनेचा पाणी पुरवठा थांबविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कालवा निहाय ५० टक्के क्षेत्राचे पाणी मागणी अर्ज व अगाऊ पाणीपट्टी भरण्यासाठी उपसा सिंचन मंडळाने आवाहन केले होते. तथापि, अवघ्या १५ टक्के शेतकऱ्यांनीच मागणी नोंदविण्याची तयारी दर्शविली.  काही गावांनी तर आम्हाला आता पाण्याची आवश्यकता नाही असे लेखी पत्र जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिले आहे.
म्हैसाळ योजनेखाली मिरज, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार होता. गावनिहाय व कालवानिहाय १२ सिंचन शाखाधिकारी नियुक्त करण्यात आले होते. पहिल्या अवर्तनात ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यापर्यंत पोहोचले असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांची मागणीच नसल्याने पाणी बंद करण्यात येत आहे. वापरलेल्या पाण्याचे वीजबिल अदा करणे जलसंपदा विभागाला शक्य होणार नाही. त्यासाठी जलसंपदा महामंडळाने कोणताही निधी उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले असल्याने रब्बी हंगामासाठीचे पहिले अवर्तन दि.२३ जानेवारीपासून बंद करण्यात येत आहे.