दिघा येथील गणेशनगर येथे एमआयडीसीच्या ३००० चौरस मीटरच्या भूखंडावर वसलेल्या २५० अनधिकृत झोपडय़ांवर एमआयडीसीच्या वतीने मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली.
दिघा परिसरात एमआयडीसीच्या भूखंडावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. मोकळ्या भूखंडावर स्थानिक भूमाफियांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करून भूखंड गिळंकृत करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, एमआयडीसीने कारवाई केल्याने भूमाफियाचे धाबे दणाणले आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली.
या संदर्भात एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश माळी यांनी सांगितले की, सदरचा भूखंड हा दिघा रेल्वे स्थानकासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या भूखंडावर कुंपण टाकण्यात येणार आहे. एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.
अशा प्रकारच्या इमारती अथवा घरांची विक्री करण्याचे प्रकार सध्या सुरू असून नागरिकांनी अनधिकृत घरे घेऊ नयेत, असे आवाहन माळी यांनी केले आहे.