ब्लॅक स्टॉर्क व ग्रेट क्रेस्टेट ग्रीब यांचे प्रथमच दर्शन
वातावरणातील कायम राहिलेला गारवा, धरणाच्या ‘बॅक वॉटर’ क्षेत्रातील पाणी आणि मुबलक खाद्य या कारणांमुळे नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदा स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम साधारणत: महिनाभराने वाढला आहे. म्हणजे, मार्चच्या अखेरीपर्यंत पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षणाचा आनंद मिळणार आहे. यंदा हजारो स्थलांतरित परदेशी पक्ष्यांनी गर्दी केली असताना, त्या ठिकाणी प्रथमच ‘ब्लॅक स्टॉर्क’ आणि ‘ग्रेट क्रेस्टेड ग्रीब’ या दोन दुर्मीळ पक्ष्यांचे आगमन झाले आहे.
नाशिकपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेले नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य थंडीची चाहूल लागली तेव्हापासून वेगवेगळ्या जातीच्या हजारो स्थलांतरित पक्ष्यांनी फुललेले आहे. त्यात स्पून बिन, पोचार्ड, ब्लॅक आयबीज, फ्लेमिंगो, कॉमन डग, स्पॉटेड बिल्ड डग, पेन्टेड स्टॉर्क, उघडय़ा चोचीचा करकोचा आदी पक्ष्यांचा समावेश आहे. एरव्ही जानेवारी महिन्यात हे स्थलांतरित पक्षी परतीच्या मार्गाला निघण्यास सुरुवात होते. यंदा मात्र फेब्रुवारीच्या मध्यावरही त्यांचा डेरा कायम आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील महिनाभर ते अभयारण्यात ठाण मांडतील, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मागील वर्षी अभयारण्यात नेहमीच्या तुलनेत पक्ष्यांची संख्या अतिशय कमी होती. दुष्काळामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले गेले असले, तरी धरणाच्या दरवाजांचे काम सुरू असल्याने या ठिकाणी होणारे प्रचंड आवाज परदेशी पक्ष्यांना मज्जाव करण्यास कारणीभूत ठरले. यंदा मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने धरणाच्या ‘बॅक वॉटर’ क्षेत्रात अद्याप पाणी आहे. त्यामुळे मासे व तत्सम खाद्य पदार्थ मुबलक प्रमाणात असल्याने हे सारे पक्षी यंदा चांगलेच रमले आहेत. त्यातच मागील दोन ते तीन दिवसांत नाशिक जिल्ह्यातील तापमानाचा पारा सात अंशापर्यंत खाली गेला. वातावरणात गारवा असल्याने या सर्व बाबी स्थलांतरित पक्ष्यांच्या पथ्यावर पडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात यंदा या पक्ष्यांमध्ये आणखी दोन दुर्मीळ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झाली आहे. अभयारण्यात ‘ब्लॅक स्टॉर्क’ आणि ‘ग्रेट क्रेस्टेड ग्रीब’ हे दोन पक्षी प्रथमच आढळून आल्याची माहिती या क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीश क्षीरसागर व नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष आनंद बोरा यांनी दिली. सध्याच्या एकूणच स्थितीमुळे पुढील महिनाभर अभयारण्यात पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येईल, असेही बोरा यांनी सांगितले. अभयारण्यात सुटीच्या दिवशी पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असली, तरी या ठिकाणी वन विभागाने कोणतीही व्यवस्था केलेली नाही. प्रत्येकाला २० रुपये प्रवेश शुल्क, तसेच वाहन असल्यास वाहनतळापोटी ५० रुपये घेतले जातात. इतर राज्यांतील पक्षी अभयारण्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. त्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधाही पुरविल्या
जातात. तथापि, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात
मात्र त्याची वानवा आहे. याचा परिणाम पर्यटकांची संख्या विशिष्ट मर्यादेत सीमित राहिल्याचे लक्षात
येते.