नागपूरसह विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या मिहान प्रकल्पाचा श्वास निर्धारित दरात वीज देण्यात न आल्याने कोंडला असून कोणत्याही क्षणी त्याचे काम ठप्प पडू शकते, अशी माहिती अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी देऊन मिहान प्रकल्प वाचवण्यासाठी विदर्भ कनेक्ट संस्था सरसावली असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र सरकारने मिहानला निर्धारित दराने मान्य करूनही वीज उपलब्ध करून दिली नाही. २० वर्षांपूर्वी विदर्भाच्या विकासाच्या नावावर महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प येथे आणला.
विदर्भाप्रती पूर्ण सहानुभूती दाखवून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भ संपन्न होईल, असा विश्वास दाखवून ५ लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी खात्रीही दिली. मात्र, प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येताच येथील उद्योगांना मूलभूत सुविधाच महाराष्ट्र शासनाने दिल्या नाहीत.
मिहान प्रकल्प येथे आणताना आयटी पार्क, विद्युत घर, आरोग्य सुविधा, निर्यात युनिट, रेल्वे, रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, पाणी याशिवाय स्वस्त दरात व अखंडित वीज देण्याचे वचनही शासनाने दिले होते. याच आश्वासनावर विदेशी कंपन्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अल्प कालावधीतच आपल्यासोबत धोका झाल्याची जाणीव या कंपन्यांना झाली.
अभिजित पॉवर व एमएडीसी यांच्यात २ रुपये ९७ पैसे प्रतियुनिट या दराने वीज देण्याचा करारही झाला होता. ही वीज मिहानमधील उद्योगांना दिली जाणार होती. यातूनच शिल्लक वीज खुल्या बाजारात विकण्याची मूभा अभिजित पॉवरला देण्यात आली होती. यासाठी प्लान्ट तयारही करण्यात आला, परंतु करारातील काही त्रुटींमुळे अभिजित पॉवरला लिंकेज मिळाले नाही.
अखेरीस कोळसाही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे कंपनीने पॉवर बंद करण्याचा इशाराच शासनाला दिला आहे. पत्रकार परिषदेला दिनेश नायडू, तेजिंदरसिंह रेणू, जे.पी. शर्मा, अजय सोनी उपस्थित होते.