सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत ज्या सहकारी दूध संस्थांनी लातूर जिल्हा दूध संघास दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांना दिवाळीनिमित्त प्रतिलिटर २० पैसेप्रमाणे दर फरकाची ८ लाख ६१ हजार ५३५ रुपये रक्कम अदा करण्याचा, तसेच कर्मचाऱ्यांनाही १६.६६ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा सहकारी दूधउत्पादक व पुरवठा संघ उदगीर संघाच्या संचालक मंडळाच्या दूध शीतकरण येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बरोबरच शेतकऱ्यांकडील सारा वाया जाऊ नये म्हणून नवीन टेक्नॉलॉजी वापरून अहमदाबाद येथे तयार केलेल्या कडबाकुट्टी प्रकल्पासाठी ३० ते ४० टक्के अनुदानावर सहसंस्थेच्या दुधाच्या प्रमाणात संस्थेला देण्याचे ठरले.
दूधउत्पादक शेतकऱ्यांचे दूध नासून नुकसान होऊ नये, म्हणून ३० ते ४० डिफ्रीजचे अनुदान वाटप करण्यात आले. दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊन १४ ऑगस्टपासून म्हशीच्या दुधास शासनापेक्षा एक रुपया जास्तीचा वाढीव दर देण्यात येत असून, यापुढे हा दर चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा दूध संघ आर्थिकदृष्टय़ा सक्षम आहे. त्यामुळे दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व दूधपुरवठा करावा. दुधावरील फरकाची रक्कम संस्था प्रतिनिधींकडून प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा. राजेंद्र सूर्यवंशी व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक आर. एस. बिराजदार यांनी केले.