दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर मंत्रालयात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. दुष्काळामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक ताण दूर करण्यासाठी दुधाच्या खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा विचार सुरू असून येत्या दोन तीन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाण यांनी दिली. दुष्काळामुळे राज्यातील पशुधन संकटात आले आहे. त्यामुळे सरकारने सुरू केलेल्या ११५० चारा छावण्यांमध्ये आजमितीस ८ लाख ६९ हजार लहान-मोठी जनावरे असून त्यांच्या चारा-पाण्यावर आतापर्यंत ५८५ कोटी रुपये खर्च झाला आहे. दुभत्या जनावरांच्या चारा आणि खाद्याच्या दारात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर राज्य सहकारी दूध संघ कृती समितीनेही दूध संघांना प्रतिलिटर तीन रुपये नुकसान होत असल्याचा दावा करीत दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याची मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर दुधाच्या खेरदी आणि विक्रीच्या दरात दोन- तीन रुपयांची वाढ करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन-तीन दिवसांत दरवाढीबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.