कष्टकरी मुंबईकरांच्या हक्कांसाठी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून घर हक्क आंदोलनातर्फे १ मे रोजी दादर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहण्यात कामगारांचा मोठा सहभाग होता. अनेक कामगारांना या लढय़ात हौतात्म्य पत्करावे लागले. मात्र, आता याच कामगाराला मुंबईबाहेर घालविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मुंबईत सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीला घर मिळणे दुरापास्त झाले आहे.  सामान्य मुंबईकरांना हद्दपार करण्याच्या या षडयंत्राविरोधात मुंबईकरांनी जागे होत पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्रासारखा लढा उभारण्यासाठी एकत्र व्हायला हवे. हा मेळावा याच उद्देशाने घेतला जात असून त्यात कष्टकरी मुंबईकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
या शहराच्या गरजा कष्टकरी कामगार पूर्ण करतो. यापैकी ७० टक्के कामगार जुन्या चाळींमध्ये वा झोपडपट्टय़ांमध्ये राहतो आहे. त्यांच्या पुनर्विकासाच्या योजना कागदावरच आहेत. बीडीडी चाळीतील पोलिसांची घरे, झोपटपट्टय़ा, धारावीचा विकास, पडक्या चाळी, म्हाडा व महानगरपालिकेच्या जुन्या चाळी यांच्या विकासाची धोरणे आहेत. परंतु, त्यांची अंमलवजावणी होत नाही आहे. सर्वसामान्य मुंबईकराच्या या अस्तित्त्वाच्या लढय़ासाठी सायंकाळी ४.३०वाजता दादरच्या (पूर्व) गावसकर सभागृहात हा मेळावा होईल. यात दत्ता इस्वलकर, पत्रकार युवराज मोहिते, श्वेता तांबे, भानुदास वायंगणकर, विजया मंत्री, विठ्ठल घाग, वैभव गोसावी मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक मुंबईकरांने आपल्या हक्कांच्या घरासाठी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलनाचे सुनील शिंदे यांनी केले आहे.