सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना परवडतील अशी घरे मिळण्यासाठी लवकरात लवकर धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी ‘घर हक्क आंदोलना’तर्फे रविवारी २६ एप्रिल रोजी करी रोड येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. येथील महाराष्ट्र हायस्कूल मैदानावर सकाळी ११ वाजता हा मेळावा होईल. यात विविध उद्योगांतील कामगार, डबेवाले, टॅक्सीवाले, रिक्षावाले, फेरीवाले, परिचारिका, महानगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार, पोलिसांची कुटुंबे, एसटी कर्मचारी, रेल्वे कामगार, बँक कर्मचारी, पोस्टमन, बीडीडी चाळी, म्हाडा कॉलनी, झोपडपट्टी, जुन्या चाळीतील रहिवाशी सहभागी होणार आहेत.
मुंबईच्या रद्द केलेल्या विकास आराखडय़ात ७० टक्के लोकांच्या गरजांचा विचार केलेला नव्हता. पुढील काळात नवीन विकास आराखडा बनविताना तो केला जावा, असे घर हक्क आंदोलनाचे म्हणणे आहे. मुंबईतील ७० टक्के लोक शहरात घर घेऊ शकत नाहीत. यांच्यासाठी परवडणारी घरे सरकारने निर्माण करावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. यात घर हक्क आंदोलनाचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर, श्वेता दामले, कामगार नेते एस. के. शेटय़े, विश्वास उटगी, जयश्री खाडिलकर-पांडे, के. एल. कॉड्रोस, सुभाष तळेकर, प्रवीण येरूणकर, सुनील शिंदे, विठ्ठल घाग, मोहन चव्हाण आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत.