मीनाक्षी आणि केतकीची भारतीय वायुदलात निवड
आसमानी रंगाच्या गणवेशात भारतीय वायुदलात राहून भरारी घेण्याचे दोघींचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शहरातील केतकी अगस्ती आणि मीनाक्षी यादव या दोन विद्यार्थिनींची भारतीय वायुसेनेत अधिकारी म्हणून निवड झाली आहे. अनेक कठीण परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी हे यश मिळविले आहे. या वर्षी वायुसेनेत अधिकारी म्हणून दोन विद्यार्थिनींची झालेली निवड ही बाब नागपूरसाठी गौरवाची ठरली आहे.
मीनाक्षी यादव हिने के.डी.के.अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्नातकस्तरावर शिक्षण घेतले आहे. तिचे वडील एम.एस. यादव हे भारतीय वायुसेनेत कार्यरत आहेत तर आई गृहिणी आहे. तिला पुण्यात संगणक क्षेत्रात नोकरी मिळाली होती, पण एका खासगी कंपनीच्या कार्यालयात संगणकासमोर बसून काम करण्याकडे तिचा कल नव्हता. आसमानी रंगाच्या गणवेशात गगन भरारी घेण्याचे तिचे स्वप्न होते आणि भारतीय वायुसेनेत निवड झाल्याने तिचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.
 केतकी अगस्ती ही शिवाजी शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील केशव श्रीधर अगस्ती हे नागपुरात स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीला असून आई शिक्षिका आहे.
 तिने वायुसेनेत प्रवेश करण्यापूर्वी अनेक उल्लेखनीय सन्मान प्राप्त केले आहेत. एन.सी.सी. मधील डायरेक्टर जनरल कमेंडेशन कार्ड तिला प्राप्त झाले आहे. २०११ मधील भारतीय गणतंत्र दिवस समारंभातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी दिल्लीत तिला अखिल भारतीय एन.सी.सी. बेस्ट कॅडेट अवार्ड देण्यात आला. या दोन्ही विद्यार्थिनींना शहरातील दि फोर्सेस फाऊंडेशनचे लेफ्टनंट कर्नल महेश देशपांडे यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाले. त्याचा पुरेपूर फायदा त्यांना झाला. प्रवेश परीक्षा व एस.एस.बी.समोरील मुलाखतीत यश मिळविता आले. या दोघींचेही प्रशिक्षण डुंडीगलच्या एअर फोर्स अकादमीमध्ये येत्या जुलैपासून सुरू होणार आहे.