News Flash

खाणकामगार ‘सिलिकोसिस’ने ग्रस्त -अनुप विश्वास

खाणीत काम करणाऱ्या कामगारांना ‘सिलिकोसिस’ आणि ‘न्युमोकोनियोसिस’ हे आजार होतात. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे, असे मत खाण सुरक्षा उपमहासंचालक अनुप

| March 27, 2014 10:47 am

खाणीत काम करणाऱ्या कामगारांना ‘सिलिकोसिस’ आणि ‘न्युमोकोनियोसिस’ हे आजार होतात. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी डॉक्टरांना विशेष प्रशिक्षणाची गरज आहे, असे मत खाण सुरक्षा उपमहासंचालक अनुप विश्वास यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय खनिज आरोग्य संस्थेतर्फे वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडमध्ये ‘न्युमोकोनियोसिस संशोधन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुण्या म्हणून वेकोलिच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बेला भट्टाचार्य, संस्थेचे निदेशक डॉ. पी.के. सिसोदिया प्रामुख्याने उपस्थित होते. अनुप विश्वास म्हणाले, देशाच्या विकासात खाण उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. परंतु त्यात काम करणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष होत आहे. या कामगारांना खाणीतील धुळीमुळे ‘सिलिकोसिस’ आणि ‘न्युमोकोनियोसिस’ हे आजार होतात. या आजाराच्या पहिल्या टप्प्यातच शोध लागून त्यावर उपचार केले तर कामगार स्वस्थ राहू शकतात. खाणीत काम करणारे कामगार कसे निरोगी राहतील, याचा प्रचार व प्रसार करण्यासाठीच खाण आरोग्य संस्थेतर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेचा लाभ देशभरातून आलेल्या डॉक्टरांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
डॉ. बेला भट्टाचार्य म्हणाल्या, खाणीत काम करणाऱ्या कामगारांना धुळीशी संबंधित आजार होतात. हे आजार झाले की त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होते. कामगारांना धुळीशी संबंधित नेमके कोणते आजार होतात, याची माहिती डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. ही माहिती या कार्यशाळेतून उपलब्ध होईल, असेही त्या म्हणाल्या.
खाण कंपनीतील डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या आवश्यकतेवर डॉ. सिसोदिया यांनी भर दिला.  
या कार्यशाळेत देशभरातून खाण कंपनीचे आणि विविध संस्थेचे ३२ डॉक्टर सहभागी झाले आहेत.
राजस्थानच्या करोली जिल्ह्य़ातील खाणीमध्ये संस्थेने एक सर्वेक्षण केले. त्यात ७८ टक्के कामगार सिलिकोसिसने ग्रस्त असल्याचे आढळून आले. परंतु त्याची माहिती खाण सुरक्षा महासंचालनालयाला दिली जात नसल्याचे तसेच डॉक्टरही प्रशिक्षित नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे खाण संस्थेतर्फे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 10:47 am

Web Title: miners disease silicosis
टॅग : Loksatta,Marathi,Nagpur
Next Stories
1 कुळाचार विसरल्याने ब्राह्मणत्व धोक्यात – डॉ. रामतीर्थकर
2 संयुक्त वन व्यवस्थापनाद्वारे वन संरक्षण, संरक्षण शक्य – नकवी
3 ‘सीम्स’ रुग्णालयात अपस्मारावर शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध
Just Now!
X