रविवारी उरणच्या मोरा परिसरातील बेलदार वाडा येथील जुन्या दगडखाणीतील धबधब्याची दरड कोसळण्याचा घटना सुरू आहेत. एका घटनेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा दगडखाण परिसर धोकादायक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.
तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी मोरा परिसरातील बेलदारवाडा येथे एक दगडी खाण सुरू होती. ती बंद करण्यात आली आहे. या खाणीत डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे एक धबधबा तयार झाला आहे. पावसाळ्यात या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी उरण परिसरातील तरुण येत असतात. तसेच परिसरातील मुले खाणीच्या मोकळ्या जागेत क्रिकेटही खेळत असतात.  येथील स्थानिकांचेही येथे वावर असतो. खाणीतील दगड खिळखिळे झाल्याने त्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका अधिक असल्याने या धोकादायक स्थितीत खाणीतील प्रवेशाला बंदी घालण्याची मागणी  काँग्रेसचे नगरसेवक महेंद्र कांबळे यांनी केली आहे. या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता या खाणीची आम्ही पाहणी केली आहे. खाणीतील दरड कधीही कोसळण्याचा धोका आहे.
त्यामुळे खाण परिसर धोकादायक म्हणून फलक लावण्यासाठी उरण नगरपालिकेला पत्र देणार असल्याची माहिती चव्हाण यांनी या वेळी दिली. तहसील कार्यालयाकडून पत्र आल्यानंतर तसा फलक लावला जाईल, असे उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांनी सांगितले.