कोयना नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याच्या निष्कर्षाला एक वर्षे पूर्ण लोटले, तरी कराड तालुक्यातील तांबवे येथील पुलाकडे शासनाचे दुर्लक्षच राहिले. येथे नवीन पुलासाठी तब्बल १६ कोटी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाची कार्यवाही झालीच नाही. त्यामुळे दररोज हजारो ग्रामीण जनतेची होणारी परवड गांभीर्याने घेऊन मनसेने उपोषणासह अभिनव आंदोलन छेडल्याने तांबवे, साजूर, डेळेवाडी, आरेवाडी, गमेवाडी, उत्तर तांबवे, दक्षिण तांबवे, साजूर या गावातील हजारो लोकांची नित्याची पायपीट थांबली आहे.
पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ घोडा व बैलगाडीचा वापर करत मनसेने वाहतूक सुरू केल्याने या आंदोलनाची दखल घेत राज्य परिवहन महामंडळाने पुलावरून वाहतुकीसाठी मिनीबस सुरू केली आहे. दरम्यान, कोयना नदीवर सक्षम नवीन पूल बांधण्याच्या मागणीसाठी तांबवेकरांसह संबंधित गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तांबवेकरांनी पुलाच्या मागणीसाठी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांवर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
तांबवे गावचा पूल वाहतुकीसाठी गेल्या दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. पूल दुरूस्तीच्या प्रशासनाकडून अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात कारवाई न झाल्याने कराड-चिपळूण मार्गापासून आठ गावातील हजारो लोकांना सुमारे पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती. वारंवार मागणी करूनही पूल दुरूस्ती न झाल्याने अखेर मनसेचे नेते अ‍ॅड. विकास पवार, दादा शिंगण, महेश जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी उपोषणास प्रारंभ केला. त्यानंतर प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्याने तांबवे फाटय़ापासून लोकांना गावात नेण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी बैलगाडी व घोडा याचा वापर करत विद्यार्थी वाहतूक सुरू केली. आंदोलनात तांबवे गाव व परिसरातील महिलांचा व विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सहभाग लक्षणीय होता.  यामुळे रोजच्या पायपिटीला त्रासलेल्या ग्रामस्थांच्या तीव्र भावना गांभीर्याने घेऊन, तसेच  ‘घोडे पे सवारी’ या अभिनव आंदोलनाची दखल घेत तहसीलदार सुधाकर भोसले यांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर या चर्चेत मिनीबस सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. या चर्चेनंतर सुधाकर भोसले, अ‍ॅड. विकास पवार, महेश जगताप यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत मिनीबस सुरू करण्यात आली.