आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदिवासी विभागमंत्री विष्णू सावरा यांनी थेट सुट्टीच्या दिवशी अचानक भेट देऊन विभागातील सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. पनवेल तालुक्यातील खांदा कॉलनी व पडघा गावाजवळील तसेच ठाणे येथील कोपरी येथील मुलींच्या वसतिगृहाला मंत्र्याच्या अचानक बेधडक भेटीमुळे वसतिगृहाचे कटुसत्य समोर आले.
आदिवासी मुलांना शहरातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी शहरात निवासाची व्यवस्था असावी यासाठी आदिवासी विभागाने राज्यात ४९५ वसतिगृहे उभारली. या वसतिगृहांमध्ये राहणारे सुमारे २५ हजार मुले सुविधांपासून वंचित आहेत. या मुलांनी डिसेंबर महिन्यापासून आपल्या हक्काच्या सोयी मिळविण्यासाठी या विभागाशी संघर्ष करण्याची भूमिका घेतली. आहे. मोबाइल फोन व इंटरनेटच्या माध्यमातून संघटित होऊन या मुलांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. खांदा कॉलनीमधील वसतिगृहामधील सुनील तोटावाड यांसारख्या अनेक मुलांनी एकत्रित पुढाकार घेऊन यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन येथील समस्या त्यांच्याजवळ मांडल्या.
राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे मंत्री सवरा यांनी हे आंदोलन चिघळू नये म्हणून मुलांना लवकरच परिस्थिती सुधारेल, असे आश्वासन त्यांनी देऊन आंदोलन शांत केले होते. याचाच एक भाग म्हणून मंत्री सवरा यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी वसतिगृहामध्ये अचानक भेट दिली. या अचानक भेटीची कोणतीही कानकून आदिवासी विभागाचे सचिव, उच्च व विभागीय अधिकारी, वसतीगृहाचे गृहपाल, स्थानिक आमदार तसेच तहसीलदार यांना नव्हती.दुपारी बाराच्या ठोक्यावर मंत्री सवरा यांच्यासोबत या मुलांच्या हक्कांसाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील विष्णू गवळी हे खांदा कॉलनीमधील वसतिगृहात दाखल झाले. या भेटीत निवांत सुट्टी भोगणाऱ्या खांदा कॉलनीमधील गृहपालांनी वसतिगृहाच्या फलकावर मुलांची संख्या किती याची नोंद करण्याची पाटी कोरीच ठेवल्याचा भोंगळ कारभार मंत्र्याच्या निदर्शनास आाला. दरम्यान, मंत्री सवरा यांच्या अचानक भेटीचा धसका या विभागातील अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

समस्यांची जंत्री
मंत्री येणार याची माहिती फक्त मुलांनाच होती. त्यामुळे मुलांनी मंत्री आल्यानंतर नेहमीप्रमाणे जेवण, शैक्षणिक शिष्यवृत्ती, पिण्याचे पाणी, व्यायामशाळा, मुलींच्या सुरक्षाविषयी, इंटरनेट, शैक्षणिक निर्वाह भत्ता, अपंग आदिवासींच्या योजनेतील अडचणी, ड्रेसकोड व शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षा आरक्षणाविषयी, ठेकेदारांच्या तक्रारी, विभागातील अधिकाऱ्यांचा उद्धटपणाच्या तक्रारी मंत्री सावरा यांच्यासमोर मांडण्यात आल्या. या वसतिगृहाची क्षमता ७५ मुलांची आहे, मात्र येथे १२४ मुले राहतात. त्यामुळे येथील व्यवस्थेवर ताण पडतो. वसतिगृह शहराच्या ठिकाणी असल्यास मुलांना प्रवासाचा ताण पडणार नाही, असेही कळकळीने मुले मंत्र्यांना सांगत होती. यावर लवकरच अधिवेशनात चर्चा करू, असे आश्वासन देऊन मंत्री सवरा यांनी आपली पुढील मोहीम पडघा येथील वसतिगृहाकडे वळविली. पडघा येथून मंत्री सावरा हे ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील आदिवासी मुलींसाठीच्या वसतिगृहात हजर झाले. येथील परिस्थितीही बिकट होती. गृहपाल हजर नसल्याने व येथील सुविधांच्या बोजवारा उडाल्याने मंत्री सवरा यांनी हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन दिले.