महाराष्ट्राचा राज्यशकट जेथून हाकला जातो ते मंत्रालय सुरक्षिततेची उपाययोजना केल्यानंतरही आज असुरक्षितच आहे. तर मग मुंबईतील अन्य इमारतींची काय कथा, अशी व्यथा माजी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण कदम यांनी रविवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. प्राणाची बाजी लावणाऱ्या शहिदांच्या नातेवाईकांना, अग्निशमन अधिकारी-कर्मचारी, तसेच निवृत्तांना प्रशासनाकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आगीच्या विळख्यात दोन मजले बेचिराख झाल्यानंतर नरिमन पॉइंट मंत्रालयाची दुरुस्ती करण्यात आली. मंत्रालयामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र अनेक त्रुटींमुळे आज मंत्रालयातील यंत्रणा असुरक्षित आहे. या संदर्भात दोन मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे माहिती देण्यात आली. मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत आपण स्वत: विनाशुल्क पाहणी करून अहवाल देऊ इच्छित असल्याचे कळविले. परंतु राज्य सरकारकडून आजतागायत त्याचे उत्तरही मिळालेले नाही, अशी खंत किरण कदम यांनी व्यक्त केली.
आग लागली, इमारत कोसळली की अग्निशमन दलातील जवान तात्काळ घटनास्थळी धाव घेतात आणि प्राणाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवितात. पण अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वसंरक्षणासाठी कोणतीच योजना आजही नाही. संपूर्ण अग्निशमन दलच असुरक्षित बनले आहे, असे किरण कदम म्हणाले.
कर्तव्यावर असलेला एखादा अधिकारी किंवा जवान शहीद होतो आणि काही दिवसांनी मुंबईकर त्याला विसरून जातात. पण या शहिदाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई आणि अन्य देय रक्कम मिळविण्यासाठी पालिका दरबारी खेटे झिजवावे लागतात. अनेक नेत्यांची मनधरणी करावी लागते. यात बरीच वर्षे निघून जातात आणि शहिदांच्या कुटुंबांची परवड होते. मदतकार्य करताना अनेक जण शहीद झाले, पण त्यांच्या कच्च्याबच्च्यांचे काय झाले याची कोणीच दखल घेत नाही, असे सांगत त्यांनी एकूणच शासकीय यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली.
मदतकार्यात प्राणाची बाजी लावून मुंबईकरांचे जीव वाचविल्याबद्दल अग्निशमन दलातील अनेकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविले जाते. त्याचबरोबर सन्मान म्हणून ठरावीक रक्कम संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली जाते. परंतु निवृत्तीनंतर हा सन्मान रोखला जातो. खरे तर ही रक्कम निवृत्तीनंतरही संबंधितांना मिळायला हवी. तसेच हा सन्मान संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला दिला जातो. परंतु प्रशासन हा सन्मान हिरावून घेत आहे, असा आरोपही किरण कदम यांनी या वेळी केला.