येत्या काही दिवसांत बूथ स्तरावरील भाजपचा तोंडवळा बदलण्याची शक्यता आहे. राज्यातील ८२ हजार बूथची बांधणी करताना युवक-युवतींच्या संख्येचा समतोल राखत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आवश्यक तेथे अल्पसंख्य समाजालाही सामावून घ्या, असे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान बूथबांधणी केल्यानंतर १० हजार व्यक्तींना जोडणारी ‘व्हच्र्युअल कम्युनिटी’ निर्माण केली जाणार आहे. या दोन कार्यक्रमांबरोबरच भाजपने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्यासाठी प्रत्येक गावातून लोखंड गोळा करण्याचाही कार्यक्रम कार्यकर्त्यांना दिला आहे. कामाला लागा, असा संदेश देताना पक्षबांधणीतील हे बदल वेगळे असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने नव्याने बांधणी सुरू केली असून, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी विभागीय स्तरावर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी काय काम करावे, याचा कार्यक्रम ठरविण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. येत्या काही दिवसात भाजपामार्फत बूथ विस्तारक योजना सुरू केली जाणार आहे. बूथ बांधणी झाल्यानंतर ऑगस्टमध्ये निवडणूक कशी लढवायची, या साठी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. केवळ एवढय़ावर येणाऱ्या निवडणुका लढविल्या जाणार नाहीत, तर लोकसभेच्या तयारीसाठी सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघात १० हजार जणांना जोडून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही फडणवीस यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
फडणवीस यांनी सांगितलेल्या बूथ बांधणीच्या कार्यक्रमाला पूरक आणि पोषक कसे वागावे, याचा वर्गच आज भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी विभागीय बैठकीत घेतला. संत एकनाथ रंगमदिरात आयोजित कार्यक्रमात खासदार मुंडे म्हणाले, ‘वरून’ आदेश आल्याशिवाय हलणार नाही, असे यापुढे चालणार नाही. बहुतांश कार्यकर्ते म्हणतात, माझ्याकडे जबाबदारीच नाही. प्रत्येकाकडे एकच जबाबदारी, ती म्हणजे आपला उमेदवार निवडून आणायचा. केवळ आपलाच नाही तर मित्रपक्षांचेही उमेदवार निवडून यायला हवेत. असे करण्यासाठी किमान त्या-त्या गावातील शिवसेना व रिपब्लिकन पक्ष नेत्यांचे दूरध्वनी क्रमांक तरी स्वत:जवळ ठेवा. त्यांच्या पक्षातला नेता आला तर त्याला मान द्या. असे केले नाही तर आपण ही लढाई जिंकू शकणार नाही. ज्याचा मान त्याला मिळायलाच हवा.
खासदार मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपण जनतेच्या सुख-दु:खात सामील आहोत, असे कार्यक्रम हाती घ्या, असे सुचविले. अजूनही टँकरची आवश्यकता आहे. पीककर्जाचे पुनर्गठन झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी आहेत. या समस्या लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे, अशी सूचनाही मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केली.
‘रिपब्लिकन आंदोलनात सहभागी व्हा’
नुसतेच महायुती म्हणायचे आणि गावस्तरावर एकत्र यायचे नाही, असे करून चालणार नाही. बोधगयेतील हल्ला देशाच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने होणाऱ्या सर्व आंदोलनांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून हजेरी लावावी, अशी सूचनाही खासदार मुंडे यांनी केली.