कांदिवलीच्या आंबेडकर रुग्णालयातील छताचा भाग मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोसळला. यामुळे एक्स रे विभागात काम करणारी महिला कर्मचारी जखमी झाली असून तिच्यावर याच रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली.
कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाचा डोलारा अवघ्या वीस वर्षांत कोसळल्यावर त्याजागी अद्ययावत रुग्णालय बांधण्याचे आश्वासन सत्ताधारी सेना पक्षाने पालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानंतर घाईघाईने महापालिका निवडणुकांपूर्वी ‘ओपीडी’चे उद्घाटन झाल्यावर गेल्या वर्षी दोन सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. मंगळवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास या रुग्णालयाच्या ‘एक्स रे’ विभागातील छताचा काही भाग कोसळला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेली संचिता उतेकर ही महिला कर्मचारी यामुळे जखमी झाली. तिच्यावर उपचार केले गेले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याबाबत रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी घाईघाईने केलेले उद्घाटन की काळ्या यादीतील बिल्डरला दिलेले कंत्राट या अपघातामागे आहे, याचा छडा लावायला हवा, अशी मागणी स्थायी समितीत संदीप देशपांडे यांनी केली.