News Flash

नवीन नागझिरा अभयारण्यातील ‘ते’ कृत्य नक्षलवाद्यांचे नव्हे

निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात ‘फायर वॉच टॉवर’ जाळल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात होती.

| April 2, 2014 09:52 am

नवीन नागझिरा अभयारण्यातील ‘ते’ कृत्य नक्षलवाद्यांचे नव्हे

निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर नक्षलवाद्यांनी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रात ‘फायर वॉच टॉवर’ जाळल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात होती. मात्र, हे कृत्य नक्षलवाद्यांनी केलेले नसून चौकीदाराच्या दुर्लक्षितपणामुळे टॉवरखालील झोपडी जळाल्याचे सिद्ध झाल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्प घोषित होण्याच्या सुमारे दोन दशकांपूर्वी नागझिरा अभयारण्य व नवेगाव राष्ट्रीय उद्यानात नक्षलवाद्यांचे प्राबल्य होते. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या परिसरात नक्षलवादी कारवाया झाल्याचे ऐकिवात नाही. अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याच्या कारवाईलासुद्धा नक्षलवाद्यांनी आडकाठी घातली नाही. त्यामुळे रविवार, ३० मार्चची घटना म्हणजे व्याघ्र प्रकल्प प्रशासनासाठी धक्कादायक बाब होती.
नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्याजवळ पांगडी कॅम्पमध्ये तात्पुरत्या झोपडय़ा उभारण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कॅम्पमध्ये ‘फायर वॉच टॉवर’ उभारले आहेत. अशाच एका वॉच टॉवरखाली असलेल्या झोपडीला रविवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. त्यावेळी दोन वनमजूर पाणी आणण्यासाठी गेले होते, तर चौकीदार मडाराम शामकुंवर हा टॉवरवर बसला होता. आगीमध्ये झोपडी भस्मसात झाल्यामुळे वनमजूर रागावतील, या भीतीने मडारामने कहाणी रचली. हिरवे दुपट्टे बांधून सात नक्षलवादी आले होते. त्यापैकी दोघांकडे रायफल्स होत्या आणि त्या रायफलींच्या धाकावर त्यांनी झोपडी जाळल्याची कथा त्याने रचली. त्यावेळी साकोली वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी अशोक खुणे हे दुसऱ्या परिसरात गस्त घालत होते. वायरलेसवरून निरोप मिळताच ते घटनास्थळी आले आणि बयाणासाठी मडारामला तिरोडा पोलिस ठाण्याला घेऊन गेले. मात्र, चौकशीच्या जाळ्यात आपण अडकत जाऊ, हे लक्षात येताच सोमवार, ३१ मार्चला त्याने खरी हकीकत कथन केली. तिरोडा पोलिस ठाण्यात जाऊन पुन्हा त्याने बयाण बदलवले आणि या कृत्यामागे नक्षलवादी नाही, हे स्पष्ट झाले. मात्र, तरीही या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य ती कारवाई केली जाईल, असे विभागीय वनाधिकारी अशोक खुणे यांनी सांगितले.

अशी लागली आग
उन्हाळ्यात जंगलाला लागणारी आग लक्षात यावी म्हणून अभयारण्यातील कोअर क्षेत्रात तात्पुरते ‘फायर वॉच टॉवर’ उभारण्यात आले आहेत. त्याखालीच मजूरांसाठी तात्पुरत्या गवतांच्या झोपडय़ा उभारल्या आहेत. मजूर या झोपडीतच स्वयंपाक करतात आणि नंतर कामाला जातात. रविवारीसुद्धा दोन मजूर स्वयंपाक करून कामाला गेले आणि मडाराम टॉवरवर थांबला. मात्र, स्वयंपाकाच्या चुलीमध्ये राहिलेल्या निखाऱ्यांवर झोपडीचे गवत उडाले आणि पाहता पाहता झोपडीने पेट घेतला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 9:52 am

Web Title: mishap in nagzira santuary
Next Stories
1 पक्ष व उमेदवारांच्या हालचालींवर ‘मिडिया सेंटर’चा तिसरा डोळा
2 ‘उच्च न्यायालयाचा पेन्शनबाबतचा निर्णय शिक्षकांसाठी दिलासादायक’
3 आचारसंहितेमुळे बॅंकेतील पाच लाखांवरील व्यवहारावर निर्बंध
Just Now!
X