वर्षभरापूर्वी येथील शासकीय रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तीन जणांना कायमचे अंधत्व पत्करावे लागले. आताही सर्वोपचार रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ९ दिवसांच्या बालकाच्या शरीरात एक इंच लांबीची सुई तशीच राहिल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या निमित्ताने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.
उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील सुवर्णा संभाजी जोंधळे ही महिला लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात १० जानेवारी रोजी प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. मात्र, बाळास काविळीचे लक्षण दिसून आल्याने त्यास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला आईकडे देण्यात आले. बाळ-बाळंतीण सुखरूप असल्याचे सांगितल्यामुळे ही महिला गावी परतली. मात्र, शनिवारी (दि. १८) बाळाच्या अंगावर सूज आली. बाळाचे रडणे काही थांबत नसल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरात इंजेक्शनची सुई आढळून आली. ती खासगी डॉक्टरने काढली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाच्या प्रमुखांनी वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
प्रत्येक बालकाची काळजी घेण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. दुर्लक्ष करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी दिला. शासकीय रुग्णालयात आधीच उपचारासाठी लोक पुढे येत नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची पाळी रुग्णांवर येते. याचा अनुभव वारंवार येत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाबद्दल पुन्हा एकदा साशंकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.