सर्व शाळांमध्ये आज प्रभातफेरी
जिल्ह्य़ातल्या कुपोषित बालकांची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मार्च अखेपर्यंत संपूर्ण जिल्हाच कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकाराने संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली असून लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने सरपंचांनाही साकडे घालण्यात आले आहे.
दरम्यान,  लोकांमध्ये कुपोषण मुक्तीबाबत जनजागृती व्हावी, या साठी उद्या (मंगळवारी) जिल्ह्य़ाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी आपापल्या गावात सकाळी ९ वाजता प्रभातफेरी काढणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात कुपोषित बालकांची आकडेवारी समोर आली. ० ते ६ वयोगटातील २ लाख ७९ हजार ४२५ बालकांपैकी तब्बल २४ हजार ९६४ बालके कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले. पैकी ३ हजार ४२४ मृत्युशय्येवर होते. यापूर्वी पुसद, मेळघाट या आदिवासी भागात कुपोषण मुक्तीसाठी भरीव योगदान देणाऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नांदेड जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे.
प्रशासकीय यंत्रणेसोबतच या सत्कार्यात लोकांचा सहभाग वाढावा, या साठी जिल्ह्य़ातल्या सर्वच गावातील सरपंचांना पत्र पाठवून स्वामी यांनी कुपोषण मुक्तीसाठी साकडे घातले. तसेच तलाठी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शहरातल्या बालरोगतज्ज्ञांची बैठक घेऊन त्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले. काही बालरोगतज्ज्ञांनी ग्रामीण भागात जाऊन उपचार करण्याची तयारीही दर्शविली. स्वत: स्वामी यांनी चिमेगाव, धनज व झरी ही तीन गावे दत्तक घेतली असून अनेक गावांचा ते नियमित आढावा घेत आहेत.
कुपोषण मुक्तीच्या या निर्धाराबाबत दिलीप स्वामी यांनी सांगितले, की सर्वाधिक कुपोषित बालके नांदेड तालुक्यात आहेत. कमी वजन व तीव्र कमी वजन अशा दोन गटांत कुपोषित बालकांची विभागणी केली जाते. गंभीर कुपोषित बालकावर उपचारासाठी ५ हजार २०० रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. शिवाय ज्यांचा उदरनिर्वाह मजुरीवर आहे, अशांना मोबदला म्हणून दररोज शंभर रुपये देण्याची तरतूद आहे.
जेथे परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, तेथे तात्पुरते उपचार सुरू केले जातात. जिल्ह्य़ात अशी २९ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शिवाय नांदेडच्या शासकीय रुग्णालयात कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.