यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्नी सोमवारी रात्री अडीच तास चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. कामगार मंत्र्यांपाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्नही अयशस्वी ठरल्याने ताणलेल्या या प्रश्नामध्ये जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी समन्वय घडविण्यासाठी ५२ पिकाला ८५ पैसे टक्के मजुरी व १६ टक्के बोनस आणि बोनस नको असेल तर ९९ पैसे मजुरी असा प्रस्ताव दिला. मात्र बैठक संपल्यानंतर यंत्रमागधारक प्रतिनिधींनी हा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितल्याने या प्रश्नाची कोंडी आणखी वाढीस लागली आहे.
    यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी इचलकरंजीतील कामगारांनी गेल्या २७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू ठेवले आहे. याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी सोमवारी दिवसभर इचलकरंजी व कोल्हापूर येथे प्रयत्न सुरू होते. इचलकरंजीत दुपारी इंटक कामगार कार्यालयात यंत्रमागधारक व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली. आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी उभय घटकांशी चर्चा केली. यंत्रमाग कामगारांनी सध्याच्या मजुरीत ११ पैसे वाढ व दररोज ६० रुपये हजेरीभत्ता मिळावा, असा प्रस्ताव ठेवला. त्यास यंत्रमागधारक प्रतिनिधींनी नकार दिला. ही बैठक संपल्यानंतर सर्वजण कोल्हापुरात बैठकीसाठी रवाना झाले. तथापि, प्रकाश आवाडे यांना उशिरा निमंत्रण मिळाल्याने ते तसेच इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशन व इंटक कामगार प्रतिनिधी बैठकीसाठी गेले नाहीत.
    त्यांच्या अनुपस्थितीतच जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ६ वाजता बैठक सुरू झाली. जिल्हाधिकारी माने यांनी कामगार व मालक प्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. कामगार प्रतिनिधींनी दुपारच्या चर्चेवेळचाच प्रस्ताव या बैठकीवेळी ठेवला. त्यास यंत्रमागधारक प्रतिनिधींकडून नकार मिळाला. अडीच तास चर्चा करूनही तडजोड होत नसल्याचे दिसून आले. त्यावर जिल्हाधिकारी माने यांनी ८५ व ९९ पैसे असे मजुरीवाढीचे दोन प्रस्ताव सादर केले. महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी वाढ करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले. पुढील बैठकीत यावर मते कळवावीत असे आवाहन त्यांनी केले. मात्र बैठक सोडून बाहेर आल्यानंतर यंत्रमागधारकांनी हा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगितले.
या बैठकीस पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, कामगार आयुक्त रत्नदीप हेंद्रे, आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, यंत्रमागधारक प्रतिनिधी विश्वनाथ मेटे, विनय महाजन, दीपक राशिनकर, सचिन हुक्कीरे, कामगार प्रतिनिधी दत्ता माने, मिश्रीलाल जाजू, राजेंद्र निकम, सचिन खोंद्रे, भरमा कांबळे उपस्थित होते.