अकोला महापालिकेत स्थायी समिती सभागृहास शहिदे वतन हजरत टिपू सुलतान हे नाव दिल्याने आज युतीच्या नेत्यांमार्फत अकोला बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुख्य बाजारपेठ बंद पडल्याने सुमारे दहा ते बारा कोटींचे व्यवहार ठप्प झाले. या बंदला कुठेही हिंसक वळण लागले नाही. एका ठिकाणी बंद समर्थकांवर समाजकंटकांनी दगडफेक करून परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न केला. युतीच्या नेत्यांनी पालकमंत्री व इतरांवर न्यायप्रविष्ठ प्रकरणात नामकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अकोला महापालिकेत स्थायी समिती सभागृहास शहिदे वतन हजरत टिपू सुलतान हे नाव महाराष्ट्र दिनी पालकमंत्री व शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते देण्यात आले. या विषयीचा ठराव महापालिकेत आमसभेत घेण्यात आला होता. या व इतर विषयावर विरोधी पक्ष न्यायालयात गेला आहे. असे न्यायप्रविष्ठ प्रकरण पाहता हे नामकरण करण्यास विरोधकांचा आक्षेप आहे. दरम्यान, या ठरावात असे नाव स्थायी समिती सभागृहास देण्याचे ठरले होते. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्र दिनी या नावातील ‘शेर ए म्हैसूर’ हा भाग वगळत त्या जागी ‘हजरत’ हा शब्द घालण्यात आला. हा शब्द महासभेच्या ठरावात नव्हता. त्यामुळे महासभेतील ठरावाची अंशत बरोबर, तर अंशत चूक अंमलबजावणी येथे झाली. आमसभेतील ठरावातील उल्लेख व प्रत्यक्षात दिलेले नाव यातील तफावत याविषयी महापालिका आयुक्त दीपक चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, आज अकोला बंदचे आवाहन करण्यासाठी बाजारपेठेत आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार संजय गावंडे, महापालिका विरोधी पक्षनेता हरिश आलिमचंदानी, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर, भाजप शहर अध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे, उपजिल्हा प्रमुख राजेश मिश्रा, शिवसेना शहर प्रमुख तरुण बगेरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्ते मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले होते. युतीच्या नेत्यांनी टिळक मार्ग, गांधी मार्ग, कपडा बाजार या भागात रॅली काढून बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. युतीच्या नेत्यांच्या आवाहनास व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बाजारपेठ बंद केली. दरम्यान, बंद समर्थक रामद्वार येथे आल्यावर त्यांच्यावर काही समाजकंटकांनी दगडफेक करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा प्रयत्न हाणून पाडला. शहरातील इतर भागात बंद करण्यासाठी भाजपचे प्रतुल हातवळणे, धनंजय गिरीधर, अ‍ॅड.गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, राहुल देशमुख, योगेश गोतमारे, विजय इंगळे, बाळ टाले, मुन्ना यादव आदींचा सहभाग होता.