दुष्काळग्रस्त शेतक ऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला रविवारी सांगली जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शासनाच्या नकारात्मक धोरणामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी काही ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवून दिले. आंदोलनात काही गावांमध्ये कार्यकर्ते तयारीनिशी आंदोलनात उतरले होते. तर काही ठिकाणी मोजकेच कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसत होते. या आंदोलनामध्ये भाजपच्या आमदारांसह कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफ करण्यात यावे, शेती कर्ज व वीजबिले माफ केली जावीत आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन रविवारी आयोजित केले होते. सांगली जिल्हय़ामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा, पंचायत समितीचे सदस्य सयाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. भाजपचे आमदार संभाजी पवार व आमदार प्रकाश शेंडगे हे डफळापूर येथे आंदोलनात सहभागी झाले होते. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी हे सातारा तर प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे सोलापूर येथे आंदोलनात उतरले होते.
सांगली-इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा, वसगडे, पलूस येथे झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. टायरी पेटवून रस्त्यावर आडव्या टाकण्याचा प्रकार येथे घडला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. तासगाव तसेच आटपाडी तालुक्यातील दिघंची व करगनी येथेही कार्यकर्त्यांनी तासाहून अधिक काळ रास्ता रोको केला. तथापि येथे अपेक्षेइतके कार्यकर्ते जमल्याचे दिसत नव्हते. आष्टा, अंकली अशा ठिकाणी आंदोलनात उतरलेले कार्यकर्ते कमी संख्येने होते. एकंदरीत आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने पंधरवडय़ात निर्णय न केल्यास शासनाविरुद्ध आर या पारची लढाई उभारण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष खोत यांनी दिला आहे.