केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात बुधवारी व गुरूवारी विविध ३५ कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी ‘बंद’ला सोलापूर  शहर व जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यंत्रमाग व विडी उद्योगांना बुधवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे त्यांचा बंदमधील सहभाग गृहीत धरला गेला नाही. मात्र उद्या गुरूवारी या कामगारांचा बंदमध्ये सहभाग किती राहणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. पहिल्या दिवशी या बंदमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला. बँकांचे कामकाजही ठप्प होते. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही नेण्यात आला.
बंद आंदोलनात ऑटोरिक्षांचा सहभाग असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. महापालिकेची बस व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले. टांग्यांना प्रवाशांनी पसंत केल्याचे एसटी बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात आढळून आले. त्यामुळे दिवसभर टांग्यांची चलती होती.
बंदमध्ये सहभागी झालेल्या कामगार व कर्मचारी संघटनांनी दुपारी चार हुतात्मा पुतळ्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. हा मोर्चा सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, नवी पेठ, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला तेव्हा मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी सिटूचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासह सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते अशोक इंदापुरे, शंकर जाधव, भारतीय मजदूर संघाचे प्रकाश आळंदकर, जिल्हा परिषद कामगार संघटनेचे रमाकांत साळुंखे, राज्यसरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे शंतनु गायकवाड आदींची भाषणे झाली. आडम मास्तर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणावर हल्ला चढविला. स्थानिक रिक्षाचालकांच्या प्रश्नालाही त्यांनी हात घातला.
या बंदमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील १५७० महसूल कर्मचाऱ्यांपैकी १३८४ कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे महसूल विभागाचा दैनंदिन कारभार ठप्प झाला होता. मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या तुलनेने इतर राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बंदला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. २४ हजार ३५० राज्य कर्मचाऱ्यांपैकी २२ हजार ३१७ कर्मचारी प्रत्यक्षात कामावर हजर राहिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.
तथापि, राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांकडून बंदला मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे पाच हचार बँक कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे बँकांतील दैनंदिन व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले. दूरसंचार व रेल्वे विभागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.