स्थानिक स्वराज्य संस्था करप्रणालीच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी महासंघाने पुकारलेल्या ४८ तासांच्या ‘व्यापार बंद’ ला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या प्रश्नावर यापूर्वी सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी अनेक दिवस बंद पाळून आंदोलन केले होते. आता पुन्हा ‘बंद’ पुकारला गेल्याने व्यापारी वर्ग वैतागल्याचे दिसून आले.
एलबीटी रद्द होण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या ‘बंद’ ला सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने कडाडून विरोध दर्शविला असून बंदची हाक देणाऱ्या सोलापूर व्यापारी महासंघाच्या भूमिकेला साथ न देण्याचे आवाहन चेंबरने केले होते. परंतु चेंबरमध्ये सहभागी असलेल्या जवळपास सर्व ६४ व्यापारी संघटना या प्रश्नावर व्यापारी महासंघाच्या पाठीशी आहेत. त्यामुळे चेंबर एकाकी पडल्याचे मानले जात आहे.
या पाश्र्वभूमीवर व्यापारी महासंघाने यापूर्वी एकदा पाच दिवस तर दुसऱ्यांदा तब्बल सतरा दिवसांचा बंद पाळून एलबीटीला प्रखर विरोध दर्शविला होता. परंतु या प्रश्नाची कोंडी कायम असताना आता या प्रश्नावर पुणे व अन्य महानगरातील व्यापाऱ्यांनीही आंदोलनाचे हत्यार उपसल्याने त्यात सोलापुरातही बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला व्यापाऱ्यांनी पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. नवी पेठेसारख्या मुख्य बाजारपेठेत यापूर्वी बंद स्वयंस्फूर्तीने पाळण्यात आला होता. परंतु यंदा त्याठिकाणी थंडा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पांजरापोळ चौक, बाळीवेस, मधला मारुती, कन्ना चौक, साखर पेठ, अशोक चौक, पार्क चौक, रेल्वे स्थानक परिसर, सात रस्ता, होटगी रोड, जुळे सोलापूर आदी भागात बंदला तुरळक प्रतिसाद मिळाला. हैदराबाद रस्त्यावरील मार्केट यार्डातील व्यापार सुरळीतपणे सुरू होता. मात्र व्यापारी महासंघाचे प्रमुख प्रभाकर वनकुद्रे यांनी बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला आहे.