शासनाच्या विविध योजनांसाठी खर्च झालेला निधी, कामाची गुणवत्ता याची माहिती सर्वासाठी उपलब्ध व्हावी या विषयावरून पंचायत समितीच्या वतीने येथे आयोजित तालुका सभेत आ. निर्मला गावीत आणि पंचायत समितीे सभापती यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे वादावादी झाली. अखेर सभापती, उपसभापतींसह इतर पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकला
आ. गावीत यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरूवात झाल्यावर सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके आदींनी सभेच्या आयोजनात आपणांस विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला. यावेळी आमदार समर्थक आणि सभापती व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सभापतींसह इतरांच्या बहिष्कारानंतर सभा पुढे सुरू झाली. वीज, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, आदिवासी विभाग, पंतप्रधान ग्राम सडक योजना, कृषि, परिवहन आदी विभागाच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. वीज वितरण कंपनीचा मनमानी आणि गलथान कारभार उपस्थित नागरिकांनी मांडला. सभेला हेतुपुरस्सर गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. तालुक्यात रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून बांधकाम विभागाचे अधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली.
दरम्यान, आदिवासी विभागाच्या वतीने शिरसाटे येथील आश्रमशाळा अनेक वर्षांपासून लहांगेवाडी येथे सुरू असून ही आश्रमशाळा पुन्हा निर्धारित ठिकाणी सुरू करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आ. गावीत यांनी दिली. सभेस तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी किरण कोवे, जिल्हा परिषद सदस्य बेबी माळी, अलका जाधव, सुजाता वाजे, जनार्दन माळी आदी उपस्थित होते.