रस्त्यांची १५० प्रकरणे प्रलंबित अडवलेल्या रस्त्यांची तब्बल १५० प्रकरणे प्रलंबित ठेवल्याच्या निषेधार्थ आमदार विजय औटी उद्या (शुक्रवार) तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. कार्यालयातील लिपीक शरद झावरे हे लोकांकडून काही अपेक्षा ठेवून नकाशात बदल करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
तिखोल येथील गट नंबर १९२ मध्ये रस्ता अडविण्यात आला असून त्यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर दि. ९ जुलैला तहसिलदारांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. पाहणी केल्यानंतर त्यांसदर्भातील आदेश देणे गरजेचे असताना हे काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आले. तहसिलदारांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांनी वारंवार तहसील कार्यालयात चकरा मारल्या. मात्र प्रत्येक वेळी आदेश काढण्याचे काम टाळण्यात आले.
दरम्यान, अशाच प्रकारची तब्बल १५० प्रकरणे तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. त्यावर निकाल देण्यासाठी अपेक्षा ठेवली जात असल्याने तालुकाभर शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतक-यांमधील असंतोषाची दखल घेऊन औटी यांनी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नियुक्ती पाथर्डीला, काम पारनेरला
रस्ता अडवणुकीच्या तक्रारींमध्ये शेतक-यांची अडवणूक करणारे लिपीक शरद झावरे यांची पाथर्डी तहसील कार्यालयात नियुक्ती असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिका-यांशी संगनमत करून ते पारनेर येथेच काम करतात. रस्ता अडवणूक असो अथवा वाळू तस्करी सर्वच ठिकाणी झावरे यांचाच शब्द प्रमाण मानला जात असल्याने नव्याने नियुक्त झालेल्या प्राताधिका-यांनी या मनमानीच्या विरोधात योग्य निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.