जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी दुष्काळात चांगले काम केले नाही, असा आरोप करून त्यांच्या बदलीसाठी तक्रार केल्याचे मान्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आष्टीचे आमदार सुरेश धस, तसेच अमरसिंह पंडित यांनी केंद्रेकर यांची मंगळवारी भेट घेऊन दुष्काळी प्रश्नावर चर्चा केली.
केंद्रेकर यांनी सोमवारी कामकाजाला सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्रेकर बदलीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बदली प्रकरणात आमदार धस व पंडित यांनी वृत्तवाहिन्यांवर बोलताना अप्रत्यक्षपणे बदलीचे समर्थन केले होते.
या पाश्र्वभूमीवर या दोन्ही आमदारांनी केंद्रेकर यांची भेट घेतली. केंद्रेकर यांनी दोन्ही आमदारांच्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी सुरू केली.
यात प्रामुख्याने टँकर सुरू करणे, चारा छावण्या व पाण्याच्या ठिकाणी वीज कपात रद्द करणे यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.