कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या वृत्ताने कन्नड तालुक्यातील शिवसनिकांत मात्र अस्वस्थता पसरली आहे. अन्य पक्षांचे दरवाजे ठोठावूनही त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. वेगवेगळय़ा राजकीय पक्षांत जाऊन पत कमी करून घेणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेत प्रवेश नको, अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी वरिष्ठांना कळविली. अजून प्रवेश झाला नाही. जाधव यांची भूमिका दर दिवशी बदलते. त्यामुळे त्यांचा प्रवेश झाल्यावर बोलू, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मनसेला दूषणे देत बाहेर पडलेल्या आमदार जाधव यांनी दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बुधवारी मुंबईत जाहीर केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी जाहीर केलेला हा निर्णय कन्नडच्या शिवसनिकांना मात्र रुचलेला नाही. वेगवेगळय़ा पक्षांत जाणाऱ्या जाधव यांच्याविरोधात अनेकदा शिवसनिकांनी आंदोलने केली आहेत. त्यामुळे आता त्यांना पक्षात प्रवेश म्हणजे निष्ठावान शिवसनिकांवर अन्याय करणारे असेल, अशी भूमिका व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर हा प्रवेश होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
आमदार जाधव यांच्या वडिलांना मतदारसंघात मोठा मान होता. त्यांची साहित्यिकांमध्येही ऊठबस होती, मात्र बदलणाऱ्या पक्षनिष्ठा व वारंवार भूमिका बदलण्याची कार्यशैली यामुळे हर्षवर्धन जाधव नेहमीच वादग्रस्त ठरतात. सेनेत त्यांचा अजून प्रवेश झाला नाही, मात्र राजकारणात काहीही घडू शकते. यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, तेव्हा काही झाले नाही. अजूनही काही बदल होऊ शकतील, असे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना वाटते.