कन्नड-चिकलठाणा रस्त्याचे अर्धवट असलेले काम गतीने व्हावे, तसेच या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी उपोषणाचे हत्यार उपसले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने अर्धवट काम केले असतानाही त्यास ७० लाख रुपयांचे देयक मंजूर केल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला.
कन्नड-चिकलठाणा रस्त्याच्या कामाची निविदा ज्या ठेकेदारास मंजूर झाली होती, त्याला ठेका दिला नाही. अधिकाऱ्यांनी धाक दाखवून दुसराच ठेकेदार नेमला. कमी किमतीची निविदा भरूनही नाहकच ठेकेदार बदलल्याची तक्रार आमदार जाधव यांनी १७ डिसेंबरला केली. तक्रारीत रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोपही केला होता. त्या आधारे कार्यकारी अभियंत्याची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशी अहवाल दडवून ठेवला जात असल्याने उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले. कन्नड-चिकलठाणा रस्ता नाबार्ड योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर दोन किलोमीटरचे काम ठेकेदाराने पूर्ण केले. त्याचे देयकही मंजूर करण्यात आले. ही रक्कम ४० लाख ५९ हजार रुपये आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. गैरव्यवहाराची चौकशी झाली. मात्र, अहवाल दडपून ठेवला गेला. हा रस्ता रहदारीचा असल्याने तो तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी जाधव यांनी केली.
या बरोबरच कन्नड-पिशोर रस्त्याच्या कामाबाबतही त्यांनी आक्षेप नोंदविले आहेत. निकृष्ट कामाच्या अनुषंगाने गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून चौकशी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जाधव यांच्या उपोषणामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राजकीय विजनवासात गेलेल्या जाधव यांनी नव्याने बांधणीला सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे.
या रस्त्यांच्या कामास दुसरा ठेकेदार नेमावा, अशीही मागणी उपोषणादरम्यान करण्यात आली. रस्त्याचे काम निकृष्ट असेल तर त्याची चौकशी होईल. कन्नड-चिकलठाण रस्त्याचे काम गतीने करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 9, 2013 1:29 am