शहरातील वाढत्या चो-या रोखण्यात पोलिसांना अपयश येत असल्यामुळे आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांना निवेदन दिले. या वेळी कांबळे म्हणाले, सपकाळे केवळ कार्यालयातच भरपूर वेळ देतात. मात्र शहरातील चो-या कमी होण्यास त्याचा उपयोग होत नाही. दिवसा मोटारसायकलींच्या चो-या होतात. चोर शहरातीलच आहेत. कमी उत्पन्न असलेल्या अनेक तरुणांकडे महागडय़ा मोटारसायकली कशा येतात, याची चौकशी केल्यास अनेक गुन्हेगार सापडतील. घरफोडय़ा, दुकानांच्या चो-या, गंठणचोऱ्यांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांच्या आत आळा बसवून गुन्हेगारांना गजाआड न केल्यास श्रीरामपूर बंद ठेवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.  उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, राजेंद्र सोनवणे, सचिन गुजर, करण ससाणे, भरत कुंकूलोळ, प्रकाश ढोकणे, अशोक बागूल, दीपक दुग्गड आदींनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. निवेदन स्वीकारताना लवकरात लवकर गुन्हेगारीला आळा बसविला जाईल, असे आश्वासन सपकाळे यांनी दिले. या वेळी भगवान कुंकूलोळ, सुनील गुप्ता, राजेंद्र म्हंकाळे, नितीन पिपाडा, गौतम उपाध्ये, पुरुषोत्तम मुळे, रमेश गुंदेचा, नागेश सावंत, संतोष चापानेरकर आदी उपस्थित होते.