येथील शेतक-यांना बारमाही शेतीपाण्याचा हक्क प्रदान करताना  दोनदा सिलींग अ‍ॅक्टचा कायदा आणून सुपिक जमिनी काढून घेतल्या. आता इंडिया बुल्सच्या पाण्यासाठी गोदावरी कालव्यांवरील साडेअकरा हजार एकराचे ब्लॉक रद्द होणार आहेत. समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामुळे निर्माण होणारा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदारांनी विधानसभेत किती वेळा तोंड उघडले असा सवाल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केला.
तालुक्यातील गोदावरी कालव्यांच्या पाणीप्रश्नावर जागृतीसाठी गोदावरी कालवे पाटपाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी कुंभारी, वेळापूर, मढी खुर्द, धामोरी, रवंदे, करंजी, दहेगांव बोलका, चांदेकसारे, पोहेगांव आदी ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमध्ये बिपीन कोल्हे बोलत होते.
कोल्हे पुढे म्हणाले, गोदावरी कालव्यांची  पाटपाण्याची वस्तुस्थिती वेगळी असून येथील आमदारांनी  गावोगांव फलक लावून, फटाके फोडून, दिवाळीची होळी करुन दिशाभूल चालवली आहे. मुंबई न्यायालयात त्याच दिवशी सुनावणीसाठी आलेली याचिका मराठवाडा जनता विकास परिषदेची (औरंगबाद) होती. न्यायमुर्तीनी यावर कुठलाही आदेश न देता पुढील सुनावणी दि. ११ नोहेंबर नंतर होईल, असे सांगितले. परंतु नेहमीप्रमाणे विपर्यास करुन येथील आमदारांनी श्रेय लाटण्यासाठी ऐन दिवाळीत शेतक-यांची दिशाभूल करुन तालुक्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, परंतु ती विलंबाची प्रक्रिया आहे. त्यामुळे मधली एक पिढी उध्वस्त होईल. लोकांमध्ये जाऊन जागृती करुन मोठा लढा उभारण्यासाठी सज्ज व्हा, असेही ते म्हणाले.