News Flash

आमदार-खासदारच आमनेसामने

केवळ शहरच नाहीतर जिल्हय़ाचे लक्ष लागलेली लढत प्रभाग २०मध्ये होत आहे. याला कारण केवळ राजकीय नाहीतर बाजारपेठांच्या अर्थकारणाचेही आहे. अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या या शहराच्या

| December 3, 2013 01:55 am

केवळ शहरच नाहीतर जिल्हय़ाचे लक्ष लागलेली लढत प्रभाग २०मध्ये होत आहे. याला कारण केवळ राजकीय नाहीतर बाजारपेठांच्या अर्थकारणाचेही आहे. अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या या शहराच्या मध्यवस्तीतील भागात आडतबाजार, सराफ बाजार, कापड बाजार, औषध बाजार या प्रमुख बाजारपेठांचा समावेश आहे. बाजारपेठांची परिस्थिती बदलली असली तरी आजही या बाजारपेठा जिल्हय़ाच्या उलाढालीच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र मूलभूत सुविधांची तेथे वानवा आहे. त्यामुळेही व्यापारी पेठांचे या लढतीकडे लक्ष आहे.
राजकीय पातळीवर तर ही लढत चर्चेची झालीच आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी सर्व शक्ती पणाला लावून चिरंजीव सुवेंद्र यांना या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या जागेवरून युतीत प्रचंड ताणाताणीही रंगली. त्यांची लढत होत आहे ती भाजपचेच बंडखोर, अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले विद्यमान नगरसेवक संजय चोपडा यांच्याशी आणि चोपडा यांना ‘आतून’ पाठिंबा आहे तो शिवसेनेचा. त्यातूनच आमदार व खासदार यांच्यात व्यक्तिगत पातळीवर आमनेसामने झाली. त्यामुळेच या लढतीचे पडसाद केवळ मनपा निवडणुकीपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्या पुढे लोकसभा आणि विधानसभेपर्यंत उमटणार आहेत. यातील महिला जागेवर शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका मुक्ता मिसाळ यांनीही अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे.
कधीही सुटणारे पाणी, रस्त्यांची दुरवस्था, अत्यंत वर्दळ असली तरी ग्राहकांसाठी वाहनतळाची एकही सुविधा नाही, वाहतुकीची रोज होणारी कोंडी या प्रभागातल्या प्रमुख समस्या. अत्यंत गल्लीबोळांचा हा प्रभाग. युतीचेच प्राबल्य असलेल्या ठिकाणी युतीच्या मतांतच विभाजन होणार आहे. प्रभागाचा नव्याने विस्तार झाल्यानंतर मुस्लिम मतदारांची संख्या दोन हजारांपर्यंत वाढली आहे, तेही निर्णायक ठरतील. या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही उमेदवार सरसावले आहेत.
सुवेंद्र यांच्या निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी खासदार गांधी यांनी काही दिवसांपूर्वी रस्ते व पथदिव्यांसाठी सुमारे ६५ लाखांचा स्थानिक विकासनिधी या प्रभागात ओतला. मात्र ही कामे अद्याप सुरू व्हायची आहेत. मात्र आपण या प्रभागात खूप काम केल्याचा चोपडा यांचा दावा आहे. एकदा अपक्ष व दुसऱ्यांदा भाजपकडून असे ते दहा वर्षे ते नगरसेवक म्हणून आहेत. युतीमध्ये या जागेसाठी गेल्या वेळीही ताणाताणी झालीच होती. त्या वेळी वाद नको म्हणून चोपडा यांच्याकडून पाच वर्षांसाठी शब्द घेऊन ही जागा त्यांच्यासाठी सोडली, असा सुवेंद्र यांचा दावा आहे, तो अर्थातच चोपडा फेटाळतात. त्यासाठी दोघेही पक्षाच्या वरिष्ठांचा हवाला देतात. आपण आज आणि उद्याही युतीचेच आहोत, असा प्रचार करतात तर सुवेंद्र अधिकृत उमेदवार मीच आहे, याकडे लक्ष वेधतात.
खरेतर सुवेंद्र किंवा चोपडा हे दोघेही या प्रभागात राहात नाहीत. आपल्या वडिलांपासूनचा हा परंपरागत प्रभाग असल्याचे सुवेंद्र सांगतात. तर दहा वर्षे नगरसेवक असल्याने हा प्रभाग आपल्या हक्काचा, असे चोपडा सांगतात. आपण खासदारांचे चिरंजीव म्हणून उमेदवारी मिळाली नाहीतर अनेक वर्षे पक्षाचे काम करतो आहे, या प्रभागातील मतदारांना आता तरुण नेतृत्व हवे आहे, तरुण नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून काही जण वाद निर्माण करत आहेत, असे स्पष्टीकरण सुवेंद्र देतात. प्रभागाची दुरवस्था झाल्याने मनपाचा निधी कोठे गेला याचीही चौकशी व्हायला हवी, अशीही मागणी करताना ‘शहराचे हृदय चोकअप’ झाले आहे, ते दुरुस्त झाले नाहीतर ‘अ‍ॅटॅक’ येईल, असे सांगत सुवेंद्र गंज बाजार, सराफ बाजारचा ‘झवेरी बाजार’ करण्याचे आश्वासन देत आहेत. गांधी यांचे अर्बन बँकेतील विरोधकही चोपडा यांच्या मदतीसाठी धावले आहेत. मात्र सुवेंद्र चोपडा यांना प्रतिस्पर्धी मानायला तयार नाहीत, आपली लढत काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर होईल, असे ते सांगतात.
मतदार संख्या- ७७४४.
उमेदवार-
अ- नागरिकांचा मागासवर्ग (महिला), ७ उमेदवार- मंगल गुंदेचा (राष्ट्रवादी), जयश्री हुच्चे (मनसे), मुक्ता मिसाळ (अपक्ष), सरोजिनी मोहिरे(अपक्ष), साधना निस्ताने (भाजप), शेख तहेसीन (सपा), रत्नमाला वनारसे (अपक्ष).
ब- सर्वसाधारण, ६ उमेदवार- समीर बागवान (काँग्रेस), संजय चोपडा (अपक्ष), सुवेंद्र गांधी (भाजप), सलीम रंगरेज (अपक्ष), शेख ताहीर (अपक्ष), शिवनारायण वर्मा (अपक्ष).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:55 am

Web Title: mla mp face to face
Next Stories
1 ‘अगस्तीने आधी अर्बनचे थकीत कर्ज फेडावे’
2 मंडलिक यांनी पुराव्यासह स्पष्टीकरण करावे, अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावू- मुरकुंबी
3 जंतरमंतरवर १२ डिसेंबरला १ लाख शेतक-यांचे आंदोलन- रघुनाथदादा पाटील
Just Now!
X