विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपायला एक दिवस शिल्लक असताना गुरुवारी सकाळी सभागृहातील कामकाज होण्यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्य़ातील मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आज विधिमंडळ परिसरात अभिनव अशी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करून सरकारचे लक्ष वेधले. भाजपच्या विदर्भातील एका आमदाराने तर केवळ दहा मिनिटे उपोषण केले, तर पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांनी हातात बॅनर घेऊन छायाचित्रासाठी आणि प्रसार माध्यमांसमोर जनतेचे प्रश्न घेऊन निदर्शने केल्याचा देखावा केला की काय असे चित्र यावेळी दिसून आले.
मराठवाडय़ातील विशेषत: दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावा, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तातडीने जोडून वीज पुरवठा सुरळीत करावा आणि मोसंबी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी बदनापूरचे आमदार संतोष सांबरे यांनी निदर्शने केली. यावेळी शिवसेनेचे काही आमदार या निदर्शनात सहभागी झाले होते. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करण्यात आल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय गावंडे यांनी सरकारचा निषेध केला. शिवाय मतदार संघातील आणि जिल्ह्य़ातील विविध मागण्यासंदर्भात सरकारचे लक्ष वेधले. समान निधी वाटप करावा या मागणीसाठी शिवसेना, भाजप आणि मनसेच्या आमदारांनी एकत्र येऊन विधानभवनाच्या  पायऱ्यावर निदर्शने केली. भाईंदरच्या जनतेला पाणी द्या अशी मागणी करीत प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, राजन विचारे, रवींद्र वायकर, अभिजित अडसूळ आणि मनसेचे गट नेते बाळा नांदगावकर यांनी निदर्शने केली.
मराठवाडय़ातील सिंचन प्रकल्प आणि इतर मागण्यांसाठी ओमप्रकाश राजे निंबाळकर, ज्ञानराज चौगुले यांनी, तर मुंबईला एलबीएस मार्गाचे विस्तारीकरण, घाटकोपरला पाणी द्या अशी मागणी करीत आमदार राम कदम यांनी निदर्शने केली. आमदार विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विजय घोडमारे, सुधीर पारवे यांनी शहरातील विविध समस्या संदर्भात निदर्शने केली. एसएनडीएल हटाओ, नागपूर बचाओ, गोरेवाडा प्रकल्प पूर्ण करा, लिबर्टी चित्रपटगृहासमोरील उड्डाणपुलाला मंजुरी द्या, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. भाईंदरमध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि इतर शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवन परिसरात मडके फोडून सरकारचा निषेध केला. गेल्या वीस वर्षांपासून शासनाच्या जाचक धोरणामुळे २५ हजार रहिवाशांवर अन्याय होत असून जनतेला कोण न्याय देणार? असा प्रश्न उपस्थित करून शिंदे यांनी सरकारचा निषेध केला.
आमदारांच्या या वेगवेगळ्या आंदोलनाने आजचा दिवस चांगलाच गाजला. सकाळी विधिमंडळ परिसरात आमदारांना उपोषण आणि निदर्शने करण्यासाठी जागा नसल्यामुळे मिळेल त्या जागी आमदारांनी उपोषण केले. विधिमंडळ परिसरात पायऱ्यावर बॅनर लावायला जागा नसल्यामुळे काही आमदारांनी बॅनर न लावता निदर्शने केली. अधिवेशन संपायला एक दिवस शिल्लक असताना आमदारांच्या या उपोषणाने आजचा दिवस चांगलाच गाजला हे मात्र तितकेच खरे. या सर्व आमदारांच्या निदर्शनाला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी भेट दिली.
केवळ दहा मिनिटाचे उपोषण
भाजपचे आमदार चैनसुख संचेती यांनी मलकापूर आणि आकोट परिसरातील नागरी समस्या संदर्भात सकाळी उपोषण सुरू केले. दहा मिनिटे होत नाहीत, तोच पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी त्यांना ज्युस दिला आणि संचेती यांनी उपोषण संपविले. संचेती यांच्या दहा मिनिटाच्या उपोषणांची आज परिसरात चांगलीच चर्चा होती.