महावितरणने नवी मुंबईत रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
नवी मुंबईतील विविध भागांतील २७९ ट्रॉन्सफॉर्मर, ११७८ डीपी बॉक्स नादुरुस्त असून झोपडपट्टी भागातील उघडय़ावरील विद्युत वाहिन्यांमुळे शॉक लागून दुर्दैवी घटना घडत आहेत. मान्सूनचा कालावधी लक्षात घेऊन महावितरणने रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, यासाठी मंगळवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता अरुण थोरात यांची आमदार संदीप नाईक यांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी नाईक यांनी महावितरणचा ढिसाळ कारभार निदर्शनास आणून देत महावितरणने येत्या ३ जूनपर्यंत कामाचा अहवाल सादर करण्याची मागणी केली.  
दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, वाशी, नेरुळ या ठिकाणी आमदार संदीप नाईक यांनी पाहणी दौरा करून तेथील महावितरणच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी ऐरोली मतदारसंघात सुमारे १४५ ट्रान्सफॉर्मर, ७९८ डीपी बॉक्स व बेलापूर मतदारसंघात १३४ ट्रान्सफॉर्मर, ३७९ डीपी बॉक्स नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले. महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनासोबत अधिकाऱ्यांना छायाचित्रेदेखील नाईक यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता अरुण थोरात यांनी ही बाब सत्य असल्याचे मान्य करीत महावितरणकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल खंत व्यक्त केली. आगामी कालावधीत महावितरणकडे निधी प्राप्त होणार असून टप्प्याटप्प्याने या समस्या मार्गी लावू, असे आश्वासन थोरात यांनी दिले. या समस्यांची पूर्तता न झाल्यास अांदोलन करण्याचा इशारा आमदार नाईक यांनी महावितरण दिला आहे.