महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत यांच्या सहीने जाहीर करण्यात आलेली ही यादी पक्षाचे संपर्क अधिकारी संतोष धुरी व नेते वसंत लोढा यांनी प्रसिद्धिस दिली. पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांसह प्रमुख पदाधिका-यांचा या यादीत समावेश आहे. प्रमुख पदाधिका-यांची उमेदवारी जाहीर करताना पक्षाने त्यांच्या प्रभागातील जोडीदार उमेदवारांची नावे जाहीर करणे मात्र टाळले आहे. येत्या दोन दिवसांत दुसरी यादी जाहीर केली जाईल, असे धुरी यांनी सांगितले.
पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडेच उमेदवारीचे सर्वाधिकार असल्याने त्यांच्या संमतीनेच ही यादी जाहीर करण्यात आली त्यामुळे या प्रभागात बंडखोरी होणारच नाही, असाही दावा धुरी यांनी केला. जाहीर केलेले उमेदवार असे : प्रभाग २-गजेंद्र राशिनकर व ज्योती निर्मल थोरात, ३-वैभव सुरवसे व लक्ष्मी तुषार यादव, ४- संजय चांदणे व महानंदा मोहन कातोरे, ६-मनोज राऊत, ७-मनीषा दिलीप गालम व रोहिदास दंडवते, ८-वैशाली सचिन डफळ, ९-शेख नसीम खान, ११-वैशाली सुधीर मंगलारप, १२-अंबिका मोहन भिसे, १४-पोपट पाथरे व पद्मा शिवाजी गांगर्डे, १५-शालिनी विलास भालेराव व नीलेश सत्यवान म्हसे, १८-सुनीता सतीश मैड, २१-किशोर डागवाले, २२-ताराबाई गणेश शिंदे व गिरीश जाधव, २३-फरिदा साजिद सय्यद, २४-कैलास गिरवले, २६-कुसुम रमेश शेलार व श्रद्धा मिसाळ-बावर, २८-श्याम वाघचौरे, ३०-गणेश भोसले.
दरम्यान यापूर्वी काही कारणाने राहिलेल्या २५ इच्छुकांच्या लेखी परीक्षा उद्या, शुक्रवारी होणार आहेत. यापूर्वी पक्षाकडे १३३ जणांनी अर्ज केले होते, त्यातील १०१ जणांनी लेखी परीक्षा दिली, मात्र प्रत्यक्षात मुलाखतीसाठी ११५ जण उपस्थित होते. पक्षाने उमेदवारांविषयी प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी जो मोबाइल क्रमांक व ई मेल दिला होता, त्यावर सुमारे ८० जणांनी प्रतिक्रिया नोंदवल्या, मात्र या प्रतिक्रिया काय आहेत, याची माहिती देण्यास धुरी यांनी नकार दिला. मनसेची दारे सर्वासाठी खुली असली तरी बळेच कोणाला उमेदवारी देणार नाही, त्यासाठी काही जागा रिक्त राहिल्या तरी चालतील, असेही धुरी यांनी सांगितले.
उमेदवारांची दुसरी यादी आणखी दोन दिवसांनी जाहीर केली जाईल. कदाचित उमेदवारांच्या तीन याद्याही असतील, असे त्यांनी सांगितले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी सचिन डफळ, सतीश मैड, संजय झिंजे, गिरवले, केतन नवले आदी उपस्थित होते.
 निवडणुकीच्या पाण्यात बुडवणार
राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी मनसेही आपल्याला पाण्यात पाहात असल्याचा आरोप केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना मनसेचे वसंत लोढा यांनी आम्ही ‘त्यांना’ पाण्यात पाहात नाहीत तर त्यांना निवडणुकीच्या पाण्यात बुडवण्यासाठीच मतदारांत जनजागृती करत आहोत, असे स्पष्ट केले. शहरात दोन नंबरचे धंदे कोणाचे आहेत, हे सर्वाना माहीत आहे. गेली २०-२५ वर्षे ते लोकांच्या डोळय़ांत धूळफेक करत आहेत, मित्रपक्षही त्यांच्यावर आरोप करत आहे, मनसेच्या प्रबोधनास मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे लोढा म्हणाले.