चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांपासून फुटकळ आंदोलनापलीकडे ठाणेकरांचे लक्ष वेधून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील गैरसुविधांच्या मुद्दय़ावरून गुरुवारी महापालिका मुख्यालयास वेढा घालत अभिनव असे आंदोलन केले.
महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू असताना बाहेर चौकाचौकात पोस्टर्स घेऊन मनसेचे कार्यकर्ते उभे होते आणि रस्त्यावरून वाहनांना या आंदोलनामुळे कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेताना दिसत होते. मनसेने छेडलेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी महापालिका मुख्यालय परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते.
विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे जतन करण्यासाठी महापालिकेने पाच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने केली आहे. मात्र, या मागणीस मनसेने जाहीर विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात जिल्ह्य़ातील रुग्ण उपचारासाठी येतात. पण, रुग्णालयात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे हाल होतात.
त्यामुळे विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी देण्यात येणारे पैसे कळवा रुग्णालयात सोयीसुविधांसाठी खर्च करावे, अशी मागणी मनसेकडून पुढे आली आहे. ‘विक्रांत’ वाचविण्यासाठी आर्थिक मदत करण्यासंबधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या विषयपटलावर होता.
त्यामुळे या प्रस्तावाला जाहीर विरोध करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला वेढा घातला होता. महापालिकेच्या परिसरात हातात फलक घेऊन मनसे कार्यकर्त्यांचे जथ्थे उभे होते.
याच पाश्वभूमीवर महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अवघ्या दोन महिन्यांच्या परिवहन सभापती पदावरून शिवसेना, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिका परिसरात घातलेला राडय़ाचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच विक्रांत युद्धनौकेला वाचविण्यासाठी पैसे देऊ नयेत, ते कळवा रुग्णालय दुरुस्तीसाठी खर्च करावेत, अशा मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी दिली.
महापालिकेत विनानिविदा कामे करण्यात येत असून सत्ताधारी शिवसेना-भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या दबाबाखाली महापालिका प्रशासन काम करीत आहेत. तसेच महापालिका आयुक्त शिक्षण धोरण ठरविण्यात मग्न आहेत, असे आरोपही त्यांनी या वेळी केले.
कळवा रुग्णालयात सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत तर जिल्ह्य़ाचा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.