ठाणे महापालिकेत एकहाती सत्ता असूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमागे फरफटत जाण्याची वेळ शिवसेना नगरसेवकांवर आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आयत्या वेळचे विषय म्हणून तब्बल ५४५ निविदांना हिरवा कंदील दाखविण्यात आल्याची माहिती उघड झाल्याने स्थायी समितीमधील शिवसेना नगरसेवक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. या सर्व प्रस्तावांना हिरवा कंदील दाखविण्यात पुढाकार घेतल्यानंतरही मनसेचे सभापती सुधाकर चव्हाण यांनी तब्बल ३०० पेक्षा अधिक निविदा स्वतच्या अधिकारात राखून ठेवल्याने शिवसेना नगरसेवक कमालीचे अस्वस्थ बनले आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार निविदा मंजुरीसाठी सभापतींना सहकार्य करायचे आणि सभापतींनी मात्र कोणत्याही ठोस कारणाशिवास मंजूर ठराव अडवून ठेवायचे, याविषयी शिवसेना नगरसेवक दबक्या सुरात नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंजूर झालेल्या ९०० कोटी रुपयांच्या निविदा वादात सापडल्या आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी स्थायी समितीच्या दहा सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये सुमारे ५४५ प्रस्ताव आयत्या वेळचे विषय म्हणून प्रशासनाकडून मांडण्यात आले. विकास कामे वेगाने व्हायला हवीत हे जरी खरे असली तरी सुमारे ५०० हून अधिक प्रस्ताव आयत्या वेळी आणून मंजुरीची घाई स्थायी समितीला का झाली होती, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी थेट नगरविकास विभागाकडे प्रश्न उपस्थित केल्याने स्थायी समितीमधील सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवकही अडचणीत सापडले आहेत. ही प्रकरणे मंजूर करताना मनसेचे सभापती सुधाकर चव्हाण यांना शिवसेनेच्या सदस्यांनी पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे मनसेमागे शिवसेना फरफटत निघाल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.
चव्हाण-जगदाळे जोडगोळी चर्चेत
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मनसेचे एकमेव सदस्य असूनही केवळ महापौरपदाची गणिते लक्षात ठेवून शिवसेनेने सुधाकर चव्हाण यांना सभापतीपद बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता स्थायी समितीच्या कामकाजावर या दोन ज्येष्ठ नगरसेवकांचा वरचष्मा चालतो हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असले तरी स्थायी समितीत शिवसेनेचे अस्तित्व केवळ नावापुरते शिल्लक असल्याचे दिसते. ५४५ निविदांना हिरवा कंदील दाखविल्यानंतरही ३०० हून अधिक ठराव सभापतींनी अद्याप प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी पाठविलेले नाहीत. याविषयी आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी महापालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी मात्र या विषयी चिडीचूप आहेत. या ‘मौना’ मागील बोलवता धनी कोण, असा सवालही उपस्थित होत आहे. मनसेचा अवघा एकमेव सदस्य असलेला नगरसेवक सभापती होतो आणि आपल्या मर्जीप्रमाणे ठराव मागे ठेवतो, यामुळे शिवसेनेतील एक मोठा गट अस्वस्थ बनला असून वरिष्ठांच्या आशीर्वादाने सुरू असलेली ही फरफट थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित करू लागला आहे.
याप्रकरणी शिवसेनेचे सभागृह नेते आणि स्थायी समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुरध्वनी उचलला नाही, तर महापौर संजय मोरे बैठकीत असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.