अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मनसे-राष्ट्रवादी-काँग्रेस-अपक्ष यांच्या महाआघाडीने सेना-भाजप-रिपाइं महायुतीला पराभूत केले. महापौरपदी मनसेचे अशोक मुर्तडक तर, उपमहापौरपदी अपक्ष गटाचे गुरुमित बग्गा हे विजयी झाले. महायुतीचे उमेदवार सुधाकर बडगुजर व संभाजी मोरुस्कर यांचा पराभव झाला. महायुतीला रोखण्यासाठी मनसे व अपक्षांना काँग्रेस आघाडीने बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे राजकीय पटलावर एक नवीन समीकरण उदयास आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आकारास आलेल्या या महाआघाडीचा परिणाम राज्याच्या राजकीय पटलावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शुक्रवारी आयोजित विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. मनसे, राष्ट्रावादी, काँग्रेस व अपक्ष या महाआघाडीने बडगुजर यांचा ३१ मतांनी पराभव केला. एकूण १२२ सदस्यसंख्या असलेल्या पालिकेत उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बग्गा यांना ७५ तर महायुतीच्या मोरूस्कर यांना ४३ मते मिळाली. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला महाआघाडी अस्तित्वात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. महापौरपदावरून मनसे व राष्ट्रवादीमध्ये असणारा तिढाही सोडविला गेला. काँग्रेस आघाडीने मनसेच्या पारडय़ात आपली मते टाकताना सत्तेबाहेर राहण्याचे निश्चित केले. यामुळे महापौरपद मनसेकडे तर उपमहापौरपद अपक्ष गटाकडे गेले. महापौरपदासाठी एकूण नऊ उमेदवारांचे अर्ज होते. छाननीत काँग्रेसचे उद्धव निमसे यांचा अर्ज अवैध ठरला. जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सोबत जोडले नसल्याच्या कारणावरून हा अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
माघारीसाठी देण्यात आलेल्या १५ मिनिटांच्या अवधीत राष्ट्रवादीच्या सुनीता निमसे, विक्रांत मते, अपक्ष संजय चव्हाण, मनसेचे शशिकांत जाधव, सुदाम कोंबडे, सलीम शेख यांनी माघार घेतली. यामुळे मनसेचे मुर्तडक व सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यात सरळ लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदानात मुर्तडक यांना ७५ तर बडगुजर यांना ४४ मते मिळाली. सदस्यांनी बाके वाजवत त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर लगेचच उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. छाननीत विमल पाटील व छाया ठाकरे यांचे अर्ज अवैध ठरले. विक्रांत मते, लक्ष्मण जायभावे, राहुल दिवे, सिंधुताई खोडे, ज्योती गांगुर्डे, अशोक सातभाई, संजय चव्हाण, सुनीता निमसे अशा १२ जणांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे उपमहापौरपदाची सरळ लढत होऊन अपक्ष गटाचे बग्गा यांनी ७५ मते मिळवून मोरुस्कर यांचा पराभव केला. मोरुस्कर यांना ४३ मते मिळाली.
नव्या समीकरणाद्वारे महापौरपद राखण्यात यश मिळाल्याचा जल्लोष एव्हाना पालिकेचे प्रवेशद्वार आणि ‘रामायण’ या महापौर बंगल्याबाहेर सुरू झाला होता. लोकसभा निवडणुकीत मनसेवर अनामत जप्त होण्याची नामुष्की ओढवली होती. त्या वेदनादायक पराभवानंतर प्रथमच यश दृष्टिपथात आल्याने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात महापौरांचे स्वागत केले. बाहेरील रस्त्यावर छोटेखानी विजयी मिरवणूकही काढण्यात आली. या वेळी आ. वसंत गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे आदी उपस्थित होते.

मतदानापासून तीन सदस्य तटस्थ
जादूई आकडा गाठण्यासाठी महाआघाडीचे समीकरण अतिशय सहजपणे जुळले असले तरी काँग्रेस आघाडीसमवेत आजवर राहणाऱ्या माकपने मनसेसोबतच्या आघाडीत सहभागी होण्याऐवजी तटस्थ राहणे पसंत केले. सभागृहात निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले या पक्षाचे नगरसेवक तानाजी जायभावे, शिवाजी भोर यांनी तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली. हेच धोरण जनराज्य आघाडीचे आ. अपूर्व हिरे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत स्वीकारले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन फुटीर सदस्य तटस्थ राहिले. अलीकडेच जनराज्य आघाडी भाजपमध्ये विलीन झाल्याचे जाहीर झाले होते. यामुळे हिरे हे युतीच्या बाजूने राहतील असा कयास व्यक्त केला जात होता, परंतु त्यांनी मतदान न करता तटस्थ राहणे पसंत केले.

ठेकेदारांपासून पालिका वाचविली
महायुतीने एका ठेकेदाराकडे महापालिका सोपविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. ठेकेदाराच्या हाती महापालिका जाऊ नये म्हणून मनसेने काँग्रेस आघाडीच्या मदतीने ही निवडणूक लढविली. या निर्णयामुळे ठेकेदाराच्या हाती पालिका जाण्यापासून वाचली असल्याचे मनसेचे आ. वसंत गिते यांनी सांगितले. मागील अडीच वर्षांपासून मनसे नाशिकच्या विकासासाठी काम करत आहे. यापुढेही ते काम सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे-काँग्रेस आघाडीची छुपी युती उघड
महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीने मनसेला मतदान करून आजपर्यंत उभयतांमध्ये छुप्या पद्धतीने राहिलेली युती उघड केली आहे. मनसे व काँग्रेसमध्ये छुपी युती असल्याचा दावा आधीच शिवसेनेने केला होता. ही बाब आज यानिमित्ताने सिद्ध झाल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला.

सिंहस्थाच्या नेटक्या नियोजनावर भर -महापौर
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजनपूर्वक व नेटक्या पद्धतीने आयोजन केले जाईल आणि त्यासाठी शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्याकडे लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर अशोक मुर्तडक यांनी दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाशिक हे सर्वाना हेवा वाटावा असे शहर बनविण्याचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी शक्य ते प्रयत्न केले जाणार असल्याचे मुर्तडक यांनी सांगितले.

घोडेबाजार रोखण्यासाठी आघाडी
महायुतीने इतर पक्षातील सदस्यांना लाखो रुपयांचे आमिष दाखवून फोडाफोडीचे तंत्र अवलंबले होते. फोडाफोडीचे राजकारण थांबविण्यासाठी राष्ट्रवादीने मनसेला बाहेरून सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी सांगितले. मतदानावेळी राष्ट्रवादीने मनसेच्या पारडय़ात आपली मते टाकली. पण, सत्ताधाऱ्यांकडून नाशिक शहराच्या दृष्टीने चुकीचे काम झाल्यास प्रसंगी विरोधकाची भूमिका बजावली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मनसे व काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य फुटले
नव्या समीकरणांची यशस्वी जुळवाजुळव करून महापौरपद कायम राखण्यात मनसेला यश मिळाले असले तरी पक्षाने बजावलेला व्हिप धुडकावत नीलेश शेलार व शोभना शिंदे या दोन नगरसेवकांनी युतीच्या पारडय़ात मतदान केले. मनसेला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसची यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. या पक्षाचे कन्हैया साळवे व वैशाली भागवत यांनी पक्षादेश झुगारून युतीला मतदान केले. महापौरपदासाठी सर्व फुटिरांनी मतदान केले. परंतु उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या दोघा फुटिरांनी मतदान केले नाही. या फाटाफुटीचा निकालावर परिणाम झाला नसला तरी मनसे व काँग्रेसचे संख्याबळ घटले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे पक्ष एकसंध राहिले.