महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात विलक्षण रंग भरले गेले असून शिवसेना-भाजप महायुतीला रोखण्यासाठी मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत नवीन समीकरणास जन्म दिला. तथापि, मनसे व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महापौरपदावर अडून बसले आहेत. हा तिढा वरिष्ठांकडून सोडविला जाईल, असे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले. विलक्षण चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत रात्री उशिरापर्यंत फोडाफोडीचे प्रयत्न सुरू होते. या घडामोडींमुळे पालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक होत असून मतदानाच्या अर्धा तास आधी माघारीची मुदत आहे. भाजपने साथ सोडल्यानंतर मनसेने सत्ता अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादीसह इतर सर्व पक्षांशी चर्चा करण्याचे धोरण स्वीकारले. मनसे व काँग्रेस आघाडी या नव्या समीकरणावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. हा दिवस महत्त्वपूर्ण घडामोडींचा ठरला. सकाळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची भुजबळ फार्म येथे बैठक झाली. या बैठकीतच मनसेशी चर्चा करण्याचा संदेश दिला गेल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यास दुजोरा देण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे यांनी टाळले. उलट, मनसे व राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला त्यांनी निराधार ठरवले.
परंतु, या बैठकीनंतर मनसेचे आ. वसंत गिते, अतुल चांडक, राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, शहराध्यक्ष अर्जुन टिळे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उत्तम कांबळे यांच्या निवासस्थानी संयुक्त बैठक झाली. या वेळी जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येण्यावर चर्चा करण्यात आली. सेना-भाजप युतीला रोखण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र राहणार असल्यावर एकमत झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कांबळे यांनी सांगितले. सद्य:स्थितीत मनसेचे ३७, राष्ट्रवादी २० तर काँग्रेसचे १४ सदस्य आहेत. एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले असले तरी महापौरपदावर मनसे आणि राष्ट्रवादी या दोघांनी दावा सांगितला आहे. महापौरपदाबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी नमूद केले.
दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत महापौरपद काबीज करण्याच्या उद्देशाने कामाला लागलेल्या शिवसेनेने मनसेबरोबर इतर पक्षांतील नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पालिकेत शिवसेनेचे २२, भाजप १५ असे संख्याबळ असले तरी मनसे, जनराज्य, माकप व अपक्ष गटातील काही सदस्यांचे पाठबळ त्यांना आधीच मिळाले आहे. या घडामोडींमुळे प्रत्यक्ष मतदानात कोणाची सरशी होईल, याकडे सर्वाचे लक्ष आहे.