महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन एक मार्च रोजी नाशिकरोड परिसरातील शिवाजीनगरच्या समाज मंदीर मैदानात होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा संघटनेचे अध्यक्ष शिरीष सावंत यांनी दिली.
अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून बाळा नांदगावकर, शिशीर शिंदे, नितीन सरदेसाई, उत्तमराव ढिकले, मंगेश सांगळे आदी उपस्थित राहणार आहेत. वीज कर्मचारी व अधिकारी यांच्या पाल्यांना वीज कंपन्यांमधील भरतीत आरक्षण ठेवण्यात यावे, वीज कंपन्यातील रिक्त पदे त्वरित भरावीत, मराठी भूमिपुत्रांना भरतीत ८० टक्के आरक्षण ठेवावे, खासगीकरण थांबविण्यात यावे, कंत्राटी कामगारांना कंपनीत समावून घ्यावे, अनुकंपा वारसांना नोकरी देताना जाचक अटी रद्द काव्यात, वीज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभाग केंद्रीय भविष्य निर्वाह निधीला जोडू नये, पात्र संत्रचालक व तंत्रज्ञांना अभियंता पदावर बढती द्यावी, मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यात यावा, अन्यायकारक बदलीचे धोरण रद्द करावे, निवृत्तीवेतन योजना लागू करावी, आदी मागण्या वीज कंपनी प्रशासनाकडे मांडण्यात येणार आहेत. ग्राहकांचे प्रश्न संकलीत करून त्यावर उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत शेंडे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस संघटनेचे सरचिटणीस राकेश जाधव, उपाध्यक्ष सुमंत तारी, प्रशांत शेंडे, दिलीप राजे, खजीनदार रामनाथ साबळे आदी उपस्थित होते.