धरण असो की रस्ते असो, प्रकल्प दीर्घकाळ रेंगाळत ठेवून पूर्ण करायचे, त्याचे गाजावाजा करत उद्घाटन करायचे, मात्र प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून द्यायचे हा जुनाच खाक्या पूर्व मुक्तमार्गावरील शेकडो झोपडीधारक सध्या अनुभवत आहेत. मुक्तमार्ग सुरू झाला आणि त्यावरून गाडय़ाही सुसाट सुरू झाल्या, आमच्या भवितव्याचे काय, असा सवाल येथील झोपडीधारकांकडून करण्यात येत आहे. मनसेने हा प्रश्न हाती घेतला असून झोपडीधारकांना न्याय मिळाला नाही तर मुक्तमार्गावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष नवीन आचार्य यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.
पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग सुरू झाला असला तरी येथील बोगद्यावर असलेल्या सह्य़ाद्रीनगर वसाहतीमधील ७२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यास एमएमआरडीएकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील १४७ झोपडय़ांचे तसेच गौतमनगर, पांजरापोळ येथील अडीचशे झोपडय़ांचे सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवालही तयार आहे, मात्र या झोपडीधारकांचे पुनर्वसन अद्याप करण्यात आलेले नाही. मनसेचे अणुशक्तीनगर येथील विभागाध्यक्ष नवीन आचार्य हे २०११ पासून येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन एमएमआरडीएच्या आयुक्तांचे दार ठोठावत आहेत. डझनभरवेळा आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनर्वसनासाठी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्यानंतर सह्य़ाद्रीनगर येथील केवळ ६५ लोकांचे पुनर्वसन करण्यात आले असून ७२ झोपडीधारकांच्या प्रश्नाबाबत तसेच गौतमनगर येथील २५० झोपडीधारकांच्या प्रश्नावर एमएमआरडीएकडून टोलवाटोलवी करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एमएमआरडीएच्या काही अधिकाऱ्यांना बिल्डरशी संगनमत करून येथे एसआरए योजना राबवायची असल्यामुळे या झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.