तालुक्यातील घोटी-सिन्नर रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असतानाही होणाऱ्या टोल वसुलीस विरोध करीत मनसेने आंदोलनाच्या माध्यमातून बंद केलेला घोटीजवळील टोल नाका कोणत्याही निर्णयाविना अवघ्या बारा तासांतच पुन्हा सुरू झाल्याने मनसेचे आंदोलन म्हणजे एक फार्स ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
घोटीहून सिन्नर, शिर्डीमार्गे औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्याची खड्डय़ांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याची बिकट अवस्था लक्षात घेऊन जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये, अशी भूमिका वाहनचालकांच्या वतीने मनसेने घेतली. आधी रस्त्याची दुरुस्ती करा, नंतर टोल वसुली करा, अशी मागणी करीत टोल नाक्यावर मनसेने आक्रमक आंदोलन करीत टोल वसुली बंद पाडली होती. या वेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह टोल कंपनीच्या व्यवस्थापनाकडून रस्त्याच्या दुरुस्तीनंतरच टोल वसुली करण्यात येईल, असे आश्वासन देत टोल बंद करण्यात आला होता. परंतु मनसेच्या या आंदोलनास काही तासही उलटत नाही तोच रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न करताच पुन्हा टोल नाका सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. टोल वसुली पुन्हा सुरू झाल्याने आता मनसेची भूमिका काय राहील, याकडे वाहनधारकांचे लक्ष आहे.