महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांना कोतवाली पोलिसांनी अटक करून सायंकाळी त्यांची सुटका केली.
नगरसेवक किशोर डागवाले, वसंत लोढा, जिल्हा संघटक सचिन डफळ, नितीन भुतारे, वैभव सुरवसे, गणेश सुरसे, महिला संघटक अनिता दिघे आदींचा या निदर्शनात सहभाग होता. दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांची असभ्य भाषेत टिंगलटवाळी केल्याबद्धल पवार यांच्या धिक्काराच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. मनसेचे झेंडे घेऊन कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
पोलिसांनी निदर्शनासाठी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयापासून लांबवर असलेल्या धरती चौकात निदर्शने करण्यास सांगितले होते, मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला नकार देत कार्यालयाशेजारी असलेल्या रेव्हेन्यू कँटीनजवळ निदर्शने केली. पवार यांची गाडी दुपारी २ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच कार्यकर्त्यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली.
पोलीस निरिक्षक अभिमन पवार यांनी लगेचच सर्वाना ताब्यात घेतले व अटक केली. दिवसभर त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर जमावबंदी आदेश मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतक-यांची अशी कुचेष्टा करणा-या पवार यांनी सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकारी नाही अशी टीका या वेळी लोढा, डागवाले, डफळ यांनी केली.