देऊळगावराजा बसस्थानक प्रवेशद्वारावर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी
येथील देऊळगावराजा बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पडलेले खड्ड्े बुजविण्यात यावे, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्डय़ांसमोर बाकडे टाकून अनोखे आंदोलन केले. या अघोषित आंदोलनामुळे एकही बस बसस्थानकातून आत किंवा बाहेर आली नाही. या आंदोलनामुळे प्रवाशांना काही काळ त्रास सहन करावा लागला होता.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्ड्े पडले आहेत. विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा पडला आहे. याचा  सर्वाधिक त्रास वाहनचालकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकोंसह प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. हा खड्डा बुजविण्यासाठी अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. परंतु, एकाही तक्रारीची अद्याप दखल घेण्यात आली नाही. अखेर हा खड्डा तत्काळ बुजविण्यात यावा, या मागणीसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यासमोर बाकडे टाकून व त्यावर बसून आंदोलन केले. या आंदोलनामुळे  जवळपास अर्धा तास कुठलीही बस स्थानकातून आत किंवा बाहेर आली नाही. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मनसे कार्यकर्ते व वाहतूक नियंत्रक मुंढे यांच्यात चर्चा घडवून आणली. येत्या काही दिवसातच हा खड्डा बुजविण्यात येईल, असे आश्वासन वाहतूक नियंत्रकांनी दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात मनसेचे दीपक चाटे, दत्ता काळे, सतीश मोरे, दत्ता जावळे, जितेंद्र खंडारे, गोविंद बोहरा, संदीप कायंदे, सुरेश सोनार, सुनील सोळंके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.