महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरच्या महापालिकेत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत, सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संतोष धुरी यांनी देतानाच, मनसेला सत्तेत एक समिती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्यादृष्टीने राष्ट्रवादीचे आ. अरुण जगताप यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाठिंब्याच्या मोबदल्यातच मनसेला मनपात महत्वाची स्थायी समिती व महिला व बालकल्याण समितीचे उपसभापतीपद देण्याचे राष्ट्रवादीने मान्य केल्याचे समजते. धुरी गुरूवारी रात्री नगरला आले. त्यानंतर सकाळी त्यांची तसेच माेबाईलवर आमदार बाळा नांदगावकर यांचीही राष्ट्रवादीचे नेते आमदार अरूण जगताप यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली. त्यानंतरच हा निर्णय जाहीर करण्यात आला.
मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर, काही महिन्यांपूर्वी, भिंगारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती, याकडे लक्ष वेधले असता, ठाकरे यांनी स्वत:चा ‘इगो’ बाजूला ठेवून विकासाला साथ देण्यासाठी, स्थानिक पातळीवर आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच राजकारणात असे होत असते असे त्यांनी समर्थने केले. मनपामध्ये पूर्वी युतीची सत्ता होती, परंतु नगरच्या मतदारांनी युतीला नाकारले व आघाडीला सत्ता दिली, मतदारांचा हा कौल मनसेने मान्य करुन आघाडी समवेत राहण्याचा निर्णय घेतल्याचे धुरी म्हणाले. पत्रकार परिषदेच्या वेळी धुरी यांच्यासमवेत एकही नगरसेवक उपस्थित नव्हता, पक्षाचे चारही नगरसेवक आज गटनोंदणीसाठी नाशिकला गेल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यास उशीर झाल्याचे व त्यामुळे मनसेला मिळणारे एक पद गेल्याचे मान्य करताना धुरी यांनी, ठाकरे यांच्या पातळीवरील काही तांत्रिक कारणांनी उशीर झाल्याचे सांगितले. एक समिती मिळण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता पाठिंब्याची गरज नसल्याने राष्ट्रवादीने पदास नकार दिला तर, या प्रश्नावर धुरी यांनी राष्ट्रवादीवर आमचा विश्वास आहे, असे उत्तर दिले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सचिन डफळ, सतीश मैड, केतन नवले, अनिता दिघे आदी उपस्थित होते.
युतीच्या हालचाली थंडावल्या
मनसेच्या या निर्णयामुळे भाजप-शिवसेना युतीतील सत्तेच्या हालचाली आता पूर्ण थंडावल्या आहेत. सोमवारी दोन्ही पदांची निवडणूक इर्षेने लढवण्याचा देखावा युतीने केला असला तरी आता त्यांच्या दृष्टीने निवडणूक लढवणे ही औपचारिकताच ठरणार आहे. काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याचा मनसेचा निर्णय पूर्वीच झालेला होता, मात्र तो जाहीर होईपर्यंत युतीला त्यांची आशा होती.
पक्ष संघटनेत लवकरच बदल
मनपा निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे जिल्ह्य़ाच्या कार्यकारिणीची येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान फेररचना केली जाणार असल्याची घोषणा संपर्क अध्यक्ष धुरी यांनी केली. केवळ नगरच नाही तर संपूर्ण जिल्ह्य़ातच फेररचना केली जाणार आहे. मनपा निवडणुकी पूर्वीच ती होणार होती, संघटना बांधणीस उशिर झाला, आम्ही पदाधिकारीही मनपा निवडणुकीत गुंतून पडलो, असे धुरी म्हणाले.