नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्य़ांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रास्ता रोको केल्याने विविध ठिकाणी काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मनसेच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रास्ता रोको करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विदर्भात मनसेच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
टोलचे अंकेक्षण करा आणि टोल वसुली थांबविण्याच्या मागणीसाठी मनसेने बुधवारी महाराष्ट्रात महामार्गावर रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. मनसे स्टाईलचा शासनाने धसका घेतल्याचे उघड झाले. कुठलीच जोखीम न घेण्याचे आदेश असल्याने पोलिसांनी जय्यत तयारी केली. काल दुपारपासूनच सर्व टोल नाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक नोटिसा बजावत  हेमंत गडकरी व प्रवीण बरडेंसह अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली. अनेक कार्यकर्ते आधीच भूमिगत झाले.
रास्ता रोकोत तोडफोड अथवा नासधुस न करण्याची सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असल्याने आंदोलनामुळे शहरातील दळणवळण बंद होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे खुद्द राज ठाकरे यांनी कालच दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भंडारा मार्गावरील बायपास पुलाआधी मिलिंद दुपारे यांच्या नेतृत्वाखालील दहा ते पंधरा कार्यकर्ते अचानक रस्त्यावर आले. हाताची साखळी करून त्यांनी अगदी एक मिनीट रस्ता अडवून धरला. पुलाखाली तैनात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, उपनिरीक्षक कविकांत चौधरी यांच्यासह तैनात पोलीस धावले. पोलीस येताच कार्यकर्ते रस्ता दुभाजकावर चढले. वाहतूक दोन्ही दिशांनी सुरू झाली.
कार्यकर्त्यांनी शासन व मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. एका नेत्याने पोलीस निरीक्षकांना ‘फक्त पाच मिनिटे रास्ता रोको करू द्या’ अशी विनवणी केली. होकार मिळताच कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून वाहने अडविली. दोनच मिनिटात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका मोठय़ा वाहनात बसवून कळमना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
उमरेड मार्गावरील दिघोरी टोल नाक्यावर दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रवीण कुकडे व मंगेश डुके यांच्या नेतृत्वाखालील २० ते २५ कार्यकर्ते आले. रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू होती. त्यानंतर पाचच मिनिटात सहायक पोलीस आयुक्त तुकाराम गौड, पोलीस निरीक्षक रमेश बदरे व ज्ञानेश्वर मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांचे वाहन आल्यानंतर मात्र वाहतूक खोळंबली. या कार्यकर्त्यांना हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
उपशहरप्रमुख प्रशांत पवार, मिलिंद महादेवकर, चंदू लाडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी काटोल मार्गावरील टोल नाक्यावर रास्ता रोको केला. सुमारे पंधरा मिनिटे कार्यकर्त्यांनी रस्ता रोखल्याने वाहतूक खोळंबली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नेले. अमरावती मार्गावरील एमआयडीसी वळणावर असलेल्या टोल नाक्यावर मनसेचे जिल्हा प्रमुख किशोर सरायकर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. ग्रामीण भागात बेला, बुटीबोरी, कळमेश्वर, कन्हान, खापा, मौदा, रामटेक, सावनेर व उमरेड येथील टोल नाक्यांवर रास्ता रोका झाला. नागपूर शहर व ग्रामीण मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले. नागपूर-अमरावती महामार्गावरील गोंडखैरी टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसेच्या ५९ कार्यकर्त्यांना प्रभारी पोलीस निरीक्षक कंकाले यांनी अटक केली. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.