महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती सुरू केल्याचे पाहूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठीच बुधवारी आंदोलन केल्याचा आरोप महापौर शीला शिंदे यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  शिंदे यांनी म्हटले आहे की, पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. मात्र पाऊस दीर्घकाळ टिकल्याने दुरुस्तीची कामे सुरू करता येत नव्हती. दरम्यानच्या काळात मनपाचे उपायुक्त महेशकुमार डोईफोडे व शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांच्याशी याबाबत चर्चा करून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी २५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. पावसाने उघडीप देताच ही कामे सुरू करण्याचा निर्णय त्याचवेळी घेण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळीच दिल्ली दरवाजा येथून या कामाला सुरुवातही झाली. हे काम हाती घेतल्याचे समजताच मनसेने त्यानंतर काही वेळाने मनपा आवारात आंदोलन करून केवळ कामाचे श्रेय घेण्याचाच प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते.
नागरिकांच्या रास्त अडचणींबाबत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास काहीच हरकत नाही. परंतु केवळ राजकीय श्रेयासाठी मनपा म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे कितपत योग्य आहे, याचा आंदोलकांनी विचार करावा असा सल्लाही महापौरांनी या पत्रकात दिला आहे.