‘न्याय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र विधीसेवा प्राधिकरणामार्फत सुरू करण्यात आलेल्या फिरत्या लोक न्यायालयाचे (मोबाइल व्हॅन) व कायदे विषयक शिबिराचे उद्घाटन निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. बी. टर्ले यांच्या हस्ते व मनमाडचे दिवाणी न्या. कुणाल नहार, रेल्वे न्यायालयाचे न्या. एस. एन. मोमीन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या फिरत्या न्यायालयात रेल्वेची ३८ पैकी ३७ प्रकरणे निकाली निघाली तर शहर न्यायालयातील ४० पैकी १९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने न्याय आपल्या दारी कायदेविषयक साहाय्य या उपक्रमांतर्गत फिरत्या न्यायालयाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी प्रशस्त सुशोभित व्हॅनमध्ये न्यायालयाची रचना केली आहे. १० ते ३० जून या कालावधीत संपूर्ण नाशिक जिल्ह्य़ात या फिरत्या न्यायालयाचा कार्यक्रम आयोजित होत आहे. उद्घाटन कार्यक्रमास मनमाड वकील संघाचे सदस्य, पक्षकार व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वकील संघाचे सरचिटणीस अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी प्रास्ताविकात फिरत्या न्यायालयाचा उद्देश विशद केला. या फिरत्या न्यायालयात मनमाड येथील फौजदारी ३२ व दिवाणी पाच प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. पॅनल सदस्य म्हणून अ‍ॅड. राजेंद्र पालवे व अ‍ॅड. पी. एम. बापट यांनी काम पाहिले.
विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक साहाय्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांचा पैसा, श्रम आणि वेळ वाचून त्यांना जलद न्याय देण्यासाठी हा उपक्रम असल्याचे निवृत्त न्यायाधीश टर्ले यांनी सांगितले. जिल्ह्य़ात आजपर्यंत या न्यायालयामार्फत १२४ प्रकरणांची तडजोड करण्यात आली. या न्यायालयात दिवाणी, फौजदारी आणि न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जातात.