29 September 2020

News Flash

वाघ महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनींची चोरी

शहरातील क. का. वाघ महाविद्यालयातील विद्यार्थी मंगळवारी सकाळी परीक्षा देण्यात मग्न असताना चोरटय़ांनी सुमारे १५० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास

| December 12, 2012 12:32 pm

शहरातील क. का. वाघ महाविद्यालयातील विद्यार्थी मंगळवारी सकाळी परीक्षा देण्यात मग्न असताना चोरटय़ांनी सुमारे १५० विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाविद्यालयाच्या आवारात ही घटना घडूनही व्यवस्थापनाने हात वर करण्याची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वसतीगृह वा बाहेर इतरत्र वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्येकी दोन ते पाच हजार रुपयांची रक्कम यात गेल्यामुळे त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
महाविद्यालयातील असुरक्षिततेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असताना आता केवळ विद्यार्थीच नव्हे तर, त्यांचे साहित्यही सुरक्षित नसल्याचे या प्रकाराने स्पष्ट होत आहे. पंचवटीतील क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘मॅकेनिकल’ अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांना या प्रकाराची झळ सोसावी लागली. मंगळवारी त्यांचा चौथ्या सेमिस्टरचा इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा पेपर होता. वर्गात परीक्षेसाठी जाताना त्यांना त्यांच्या बॅगा व अन्य साहित्य
ठेवण्याची व्यवस्था काहीशा दूर अंतरावरील बांधकामशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली होती. पेपरला जाण्यापूर्वी सुमारे दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या बॅगा, भ्रमणध्वनी व तत्सम साहित्य या ठिकाणी ठेवले होते. पेपर सुटल्यानंतर ते जेव्हा साहित्य नेण्यासाठी परत आले, तेव्हा चोरीचा हा प्रकार उघड झाला. सर्वाचेच मोबाईल व रोख रक्कम चोरीला गेल्याने एकच गोंधळ उडाला. प्रयोगशाळेच्या पुढील दरवाजास कुलूप असताना मागील दरवाजा तोडून चोरटय़ाने ही करामत केल्याचे विकी सांगळे, अनंत जायभावे, विक्रम बेलगावकर या विद्यार्थ्यांनी सांगितले.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी प्राचार्याकडे धाव घेतली. परंतु, व्यवस्थापनानेही त्याची तातडीने दखल घेतली नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. एवढेच नव्हे तर, चोरीला गेलेल्या साहित्याची जबाबदारी तुमची असल्याचे सांगून हात झटकण्याची भूमिका व्यवस्थापनाने स्वीकारल्याने विद्यार्थी अधिकच संतप्त झाले. पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी केली. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे अतिशय महागडे म्हणजे २० ते २५ हजार रुपयांच्या भ्रमणध्वनींचाही समावेश आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची पाकिटे बॅगेत ठेवलेली होती, त्यामधून ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम चोरटय़ाने गायब केली. त्याची सर्वाधिक झळ वसतीगृह वा इतरत्र राहणाऱ्या बाहेर गावाकडील विद्यार्थ्यांना बसली. घरभाडे व खानावळीसाठी साठविलेले पैसे चोरीस गेल्याने विद्यार्थ्यांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. माहीतगार व्यक्तीकडून चोरीचा हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार ४५ विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनी चोरीस गेल्याची तक्रार एका निवेदनाव्दारे केली आहे. चोरीस गेलेला एकूण ऐवज सुमारे ५५ हजारांचा असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 12:32 pm

Web Title: mobile robbery of 150 students in vagh college
Next Stories
1 वाघूरची कूर्मगती अन् वाढता खर्च
2 ..आता मध्य प्रदेश पर्यटन विभागाचीही नाशिकवर स्वारी
3 भंवरलाल जैन यांचे पाणी व्यवस्थापन तंत्र नव्याने अधोरेखीत
Just Now!
X