विविध प्रमाणपत्रांसाठी सेतू केंद्राकडे अर्ज करणाऱ्यांना त्यांचे प्रमाणपत्र तयार असल्याची माहिती एसएमएसवर देण्याची योजना तीन दिवसात कार्यान्वित करण्यात आली असून पहिल्याच दिवशी ८५ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी सचिव कुर्वे यांनी २० मे रोजी पदभार स्वीकारला. त्याच दिवशी त्यांनी जिल्हा सेतू केंद्रातील कामकाजात काही बदल करण्याचे संकेत दिले होते. सेतू केंद्रात विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणाऱ्यांना त्यांचे प्रमाणपत्र तयार झाले किंवा नाही हे पाहण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घ्यावे लागतात. त्यांना नीट माहिती दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हींचाही अपव्यय होत होता. ही पद्धत बदलण्यासाठी कुर्वे यांनी अर्जदारांना त्यांचे प्रमाणपत्र तयार असल्याची माहिती देण्यासाठी एसएमएस करण्याची योजना सुरू करण्याचे आदेश दिले होते. तीन दिवसात संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आणि नागरिकांना एसएमएसव्दारे माहितीही मिळायला लागली. खुद्द कुर्वे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सेतू केंद्रात आलेल्या अर्जाचा झटपट निपटारा व्हावा यासाठी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक अधिकारी एक-एक दिवस कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. पहिल्या दिवशी ८५ जणांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांकडून अर्ज स्वीकारतानाच त्यांचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल घेतला जातो व त्यांचे प्रमाणपत्र तयार झाल्यावर त्यांना एसएमएस केला जातो. हा प्रकार नवीन असला तरी नागरिकांना सुखावणारा असल्याने त्याचे स्वागत होत आहे. ऐरवी दलालांकडून जाणाऱ्यांनाच प्रथम प्रमाणपत्र मिळत होते व नियमानुसार अर्ज करणाऱ्यांना चार-चार महिने वाट पाहावी लागत होती, हे येथे उल्लेखनीय.